स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोला लागली लॉटरी

स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोला लागली लॉटरी

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नस्सरसोबत अडीज वर्षांचा करार केला आहे. विशेष म्हणजे रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर रोनाल्डो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. या फिफा विश्वचषक २०२२ नंतर रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते. मात्र या करारामुळे आता त्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (Cristiano Ronaldo sign Agreement with Saudi club)

मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. त्यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, ३७ वर्षीय रोनाल्डो याने २०२५ पर्यंत अल नस्सरसोबत करार केला आहे. यासाठी त्याला २०० मिलियन यूरो (१७७५ कोटी रुपये) मिळणार आहेत.

फुटबॉल क्लब अल नस्सरने याची माहिती दिली आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नस्सरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे जिंकली आहेत. या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल.

या करारानंतर “युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही मिळविण्याचे मी ठरवले होते ते सर्व मी जिंकले आहे, त्यासाठी भाग्यवान आहे. आता मला वाटते की आशियातील माझा अनुभव शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे”, असे रोनाल्डोने म्हटले आहे.

रोनाल्डोने २००९-१८ पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.


हेही वाचा – माणुसकीला काळिमा! ऋषभ पंत रक्ताच्या थारोळ्यात ओरडतोय, पण लोक पैसे गोळा करतायत

First Published on: December 31, 2022 8:39 PM
Exit mobile version