IPL 2021 : थाला इज बॅक! आगामी मोसमाच्या तयारीसाठी धोनी चेन्नईत 

IPL 2021 : थाला इज बॅक! आगामी मोसमाच्या तयारीसाठी धोनी चेन्नईत 

महेंद्रसिंग धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. सीएसकेच्या सराव शिबिराला ९ मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता असून त्यासाठी धोनी बुधवारी चेन्नईत दाखल झाला. आता त्याला पाच दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. सीएसके संघाने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. सीएसके संघाला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांना १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले होते. यंदा मात्र या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी सीएसकेचा संघ उत्सुक असून आगामी मोसमासाठी ९ मार्चपासून तयारीला सुरुवात करणार आहे.

पाच दिवस क्वारंटाईन

सीएसकेच्या सराव शिबिराला ९ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले. तसेच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसलेले आणि इतर उपलब्ध खेळाडू या सराव शिबिरात सहभागी होणार असल्याचेही विश्वनाथन म्हणाले. सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना चेन्नईत दाखल झाल्यावर पाच दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल आणि तीन वेळा त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येणेही गरजेचे आहे.

वेळापत्रक जाहीर झालेले नाही

आयपीएलच्या आगामी मोसमाचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, सीएसके संघाने तयारीला सुरुवात केली आहे. यंदाच्या खेळाडू लिलावात सीएसकेने कृष्णप्पा गौतम (९.२५ कोटी), मोईन अली (७ कोटी) आणि चेतेश्वर पुजारा (५० लाख) यांसारख्या खेळाडूंना खरेदी केले होते.

First Published on: March 4, 2021 10:00 PM
Exit mobile version