IPL : तर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला संघाबाहेर काढावे – आकाश चोप्रा   

IPL : तर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला संघाबाहेर काढावे – आकाश चोप्रा   

आकाश चोप्रा आणि महेंद्रसिंग धोनी 

युएईमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाने निराशाजनक कामगिरी केली. चेन्नईला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. त्यातच या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही चांगला खेळ करता आला नाही. त्याने १४ सामन्यांत केवळ २०० धावा केल्या, तर त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. तसेच त्याने कर्णधार म्हणूनही काही चुका केल्या. त्यामुळे सध्या धोनीच्या भविष्याबाबत बरीच चर्चा होत आहे. चेन्नईच्या संघाने कर्णधार धोनीला सोडचिट्ठी देण्याचा विचार केला पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला वाटते.

पुढील आयपीएल स्पर्धेआधी ‘मेगा’ खेळाडू लिलाव झाला, तर चेन्नईच्या संघाने धोनीला सोडचिट्ठी दिली पाहिजे. मेगा लिलाव झाला, तर खेळाडू त्या एका संघासोबत तीन वर्षे राहील. मात्र, धोनी आणखी तीन वर्षे खेळणार का? चेन्नईने धोनीला संघात घेऊच नये, असे माझे म्हणणे नाही. तो पुढच्या मोसमात खेळणार आहे. मात्र, त्याला चेन्नईने संघात कायम ठेवले, तर त्याच्यासाठी १५ कोटी रुपये इतकी रक्कम मोजावी लागेल, असे चोप्रा म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, धोनी केवळ २०२१ मध्ये खेळला आणि त्यानंतर निवृत्त झाला, तर चेन्नईला १५ कोटी परत मिळतील. मात्र, त्यावेळी मेगा लिलाव होणार नाही आणि धोनीची जागा घेऊ शकेल असा खेळाडू शोधण्यासाठी चेन्नईसमोर फारसे पर्याय नसतील. त्यामुळे चेन्नईला १५ कोटी रुपयांचा फारसा उपयोग होणार नाही. त्याऐवजी त्यांनी आता धोनीला सोडचिट्ठी देऊन पुन्हा लिलावात खरेदी केले पाहिजे. तसे केल्यास चेन्नईचा फायदा होईल.

First Published on: November 17, 2020 7:43 PM
Exit mobile version