IPL 2020 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीची कमाल; दोन विक्रम झाले नावावर 

IPL 2020 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीची कमाल; दोन विक्रम झाले नावावर 

जॉनी बेअरस्टो आणि डेविड वॉर्नर

गुरुवारी (आज) आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना होत आहे. दुबई येथे होणाऱ्या या सामन्यात कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या हैदराबादच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी केली. खासकरून बेअरस्टोने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी १५.१ षटकांत तब्बल १६० धावांची सलामी दिली. ही त्यांची यंदाच्या मोसमातील पहिलीच शतकी भागीदारी ठरली. वॉर्नरने ४० चेंडूत ५२ धावा, तर बेअरस्टोने ५५ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने या सामन्यात दीडशे धावांची भागीदारी रचताना दोन खास विक्रमही आपल्या नावावर केले.

१००० धावांचा टप्पा पार

वॉर्नर-बेअरस्टो या जोडीने पंजाबविरुद्ध दीडशे धावांची भागीदारी रचली. या दरम्यानच त्यांनी हैदराबादची सलामीची जोडी म्हणून १००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारी ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सातवी जोडी ठरली. आयपीएलमध्ये सलामीची जोडी म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम हा वॉर्नर आणि शिखर धवन या जोडीच्या नावावर आहे. वॉर्नर आणि धवन यांनी मिळून २२२० धावा केल्या होत्या. त्यांनी या धावा ४७.२३ च्या सरासरीने केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीच्या जोड्या : १] डेविड वॉर्नर-शिखर धवन (२२२० धावा), २] गौतम गंभीर-रॉबिन उथप्पा (१४७८ धावा), ३] ब्रेंडन मॅक्यूलम-ड्वेन स्मिथ (१३६३ धावा)  

पाचवी शतकी भागीदारी 

तसेच वॉर्नर आणि बेअरस्टो यांची शतकी भागीदारी ही एकूण पाचवी वेळ होती. विशेष म्हणजे त्यांनी ही कामगिरी केवळ १६ डावांमध्ये केली. १०० हून अधिक धावांची भागीदारी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा रचणारी ही केवळ पाचवी जोडी आहे. सर्वाधिक वेळा शतकी भागीदारीचा विक्रम विराट कोहली आणि क्रिस गेल, तसेच कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोन जोड्यांच्या नावे आहे. त्यांनी तब्बल ९ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

First Published on: October 8, 2020 10:05 PM
Exit mobile version