डे-नाईट कसोटी कधीतरीच ठीक!

डे-नाईट कसोटी कधीतरीच ठीक!

डे-नाईट सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळेल, पण हे सामने कधीतरीच झाले पाहिजेत, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. मागील काही वर्षांत एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटमुळे चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आयसीसीने चार वर्षांपूर्वी डे-नाईट कसोटी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत ८ संघांनी डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, कोहलीच्या भारतीय संघाने डे-नाईट कसोटी खेळण्यास नकार दर्शवला होता. मात्र, या सामन्यांमुळे चाहते पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळतील अशी कोहलीला आशा आहे.

माझ्या मते, चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळवण्यासाठी डे-नाईट सामने हा एकमेव पर्याय नाही. नियमित कसोटी सामने होणेही खूप गरजेचे आहे. नियमित कसोटी सामन्यांमध्ये सकाळच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करणे अवघड असते. त्यामुळे फलंदाजांच्या शैलीचा आणि मानसिकतेचा कस लागतो. कसोटी क्रिकेट म्हणजे केवळ मनोरंजन नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकाव धरणे आणि गोलंदाजांनी चतुराईने फलंदाजाला बाद करणे, यात खरी कसोटी क्रिकेटची मजा आहे. लोकांना हे आवडत नसल्यास आपण काहीही करू शकत नाही, असे कोहली म्हणाला.
तसेच गुलाबी चेंडूविषयी कोहलीने सांगितले, स्लिपमध्ये झेल पकडताना गुलाबी चेंडू हा जड हॉकी चेंडूप्रमाणे वाटतो. गुलाबी चेंडू हा लाल चेंडूपेक्षा नक्कीच जड आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी झेप पकडतानाही थोडी अडचण येऊ शकेल.

दव महत्त्वाची भूमिका बजावेल!

भारतीय संघ शुक्रवारपासून बांगलादेशविरुद्ध आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावेल, असा भारताचा कर्णधार विराट कोहलीचा अंदाज आहे. याबाबत त्याने सांगितले, भारतातील डे-नाईट कसोटी सामन्यांत दव महत्त्वाची भूमिका बजावले. याव्यतिरिक्त भारत आणि इतर देशांत होणारे डे-नाईट कसोटी सामने यात काहीही फरक नाही. खासकरून अखेरच्या सत्रात दव पडण्याची शक्यता आहे. आम्ही सामनाधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र, दव कधी पडणार हे तेसुद्धा सांगू शकत नाहीत.

First Published on: November 22, 2019 3:05 AM
Exit mobile version