मनगटी फिरकीपटू पाडतील छाप!

मनगटी फिरकीपटू पाडतील छाप!

ईडन गार्डन्स येथे होणार्‍या भारत आणि बांगलादेश यांच्यातील डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामन्यात मनगटी फिरकीपटूंविरुद्ध खेळणे सर्वात आव्हानात्मक असेल, असे मत भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. भारत-बांगलादेश यांच्यातील या कसोटी सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडू कशी हालचाल करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

डे-नाईट कसोटी सामन्यात मनगटी फिरकीपटूंविरुद्ध खेळणे सर्वात आव्हानात्मक असेल. गुलाबी चेंडूची सीम ही काळ्या रंगाची असते. त्यामुळे चेंडू कोणत्या दिशेने जात आहे हे कळायला फलंदाजांना अडचण येऊ शकेल, असे हरभजन म्हणाला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला भारताने या सामन्यात खेळवले पाहिजे का, असे विचारले असता हरभजनने सांगितले, कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचे हा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. मात्र, फिरकीपटूंआधी बांगलादेशच्या फलंदाजांना भारताच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. ३.३० ते ४.३० या वेळेत कोलकात्यात सूर्यास्त होतो आणि याच वेळी वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक मदत मिळेल. परंतु, भारताला पुढेही डे-नाईट कसोटी सामने खेळायचे असल्यास फिरकीपटू कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल. २०१६ मध्ये झालेल्या दुलीप करंडकात कुलदीपचा सामना करताना फलंदाजांना खूप अडचणी आल्या होत्या.

तसेच मनगटी फिरकीपटूंविषयी हरभजन पुढे म्हणाला, मनगटी फिरकीपटू चेंडू सीमवर सोडतात. त्यामुळे त्यांना उसळी मिळते. तसेच ते जेव्हा गुगली टाकतात, तेव्हा चेंडूची सीम खूप हलते. त्यामुळे चेंडू कोणत्या दिशेने जाणार हे फलंदाजांना लवकर कळत नाही.

बांगलादेशचा चेंडू ओला करुन सराव!                                                                                        कोलकाता येथे होणार्‍या डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामन्यात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशचे वेगवान गोलंदाज या सामन्यासाठी चेंडू ओला करुन सराव करत आहेत, अशी माहिती बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसनने दिली. आमचे वेगवान गोलंदाज चेंडू ओला करून गोलंदाजी करत आहेत आणि पुढेही करत राहतील. चेंडू ओला असल्यास वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंना अधिक उसळी मिळण्याची शक्यता आहे, असे मेहदीने सांगितले.

First Published on: November 20, 2019 2:02 AM
Exit mobile version