टेस्ट मालिका सोडून IPL खेळाणाऱ्या खेळाडूंना संघात घेणार नाही?, आफ्रिकेच्या कॅप्टनने दिला सूचक इशारा

टेस्ट मालिका सोडून IPL खेळाणाऱ्या खेळाडूंना संघात घेणार नाही?, आफ्रिकेच्या कॅप्टनने दिला सूचक इशारा

कसोटी मालिका सोडून आयपीएल खेळायला भारतात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना कर्णधार डीन एल्गारने सूचक इशारा दिला आहे. मला माहित नाही की त्यांची पुन्हा संघात निवड होईल की नाही? ते माझ्या हातात नाही, असं एल्गार म्हाणाला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपेक्षा आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना इशारा देताना दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गरने हे वक्तव्य केले आहे. कागिसो रबाडा, मार्को जेनसेन, लुंगी एनगिडी, नॉर्खिया, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडेन मार्करम यांच्यासह अनेक आफ्रिकन खेळाडूंनी कसोटी मालिका न खेळता आयपीएल खेळण्याला प्राधान्य दिले आहे.

यावरून दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापन खूश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशिक्षक मार्क बाउचरही आपल्या कर्णधाराशी सहमत असल्याचे दिसून आले. त्यांनी आयपीएलला जाऊन त्यांची जागा रिक्त केली, असे बाउचर म्हणाला. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत, दक्षिण आफ्रिकेने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशकडून एकदिवसीय मालिका गमावावी लागली.

एल्गर म्हणाला, तुम्ही चांगले क्रिकेट खेळत असाल आणि निकाल तुमच्यानुसार येत असतील, तर कर्णधारपदाचा भार कमी होतो. मागिल वर्ष मैदानाबाहेर खूप आव्हानात्मक होते, पण माझ्याकडे असे खेळाडू आहेत जे मला समजून घेतात आणि एक खेळाडू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून माझा आदर करतात. मला कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे हे त्यांना समजते. बहुतेक ज्येष्ठ खेळाडूंना याची जाणीव आहे. आम्ही खूप खास ठिकाणी आहोत. मला माझ्या कामात खूप आनंद होतो, असे एल्गरने म्हटले.

दक्षिण आफ्रिका ऑगस्टमध्ये कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. एल्गर म्हणाला, मला आव्हाने आवडतात, म्हणूनच मी आजही ३५ वर्षांचा असताना कसोटी क्रिकेट खेळत आहे. मला असे वाटते की माझ्याकडे चांगली वर्षे शिल्लक आहेत, कदाचित माझी सर्वोत्तम वर्षे बाकी आहेत. मी त्याचा खरोखर आनंद घेत आहे. मला वाटते की मी तरुण असतो तर कदाचित मला इतकी मजा आली नसती, असे एल्गर म्हणाला.

 

First Published on: April 14, 2022 10:02 AM
Exit mobile version