Delhi Shooting World Cup : भारताला एका दिवसात तीन सुवर्णपदके

Delhi Shooting World Cup : भारताला एका दिवसात तीन सुवर्णपदके

भारताचे नेमबाज

दिव्यांश सिंह पन्वर आणि एलावेनिल वलारिवान, तसेच सौरभ चौधरी आणि मनू भाकर या जोड्यांनी आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात सोमवारी भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. दिव्यांश आणि एलावेनिलने दिवसाच्या सुरुवातीला १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत, तर त्यानंतर सौरभ आणि मनूने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच मैराज खान, अंगद बाजवा आणि गुरजोत खांगुरा या भारताच्या पुरुष संघाने स्किट प्रकारातही सुवर्णपदक आपल्या नावे केले.

दिव्यांश-एलावेनिल जोडीला सुवर्ण

१० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दिव्यांश आणि एलावेनिल या भारतीय जोडीने हंगेरीच्या इझ्तर डेनेस आणि इस्तवान पेनी या जोडीवर १६-१० अशी मात केली. या लढतीत भारतीय जोडीने चांगली सुरुवात करत ५-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, हंगेरीच्या जोडीने पुनरागमन करत आधी ६-६ आणि नंतर १०-१० अशी बरोबरी केली. यानंतर मात्र दिव्यांश आणि एलावेनिल आपली कामगिरी उंचावत ही लढत १६-१० अशी जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

इराणच्या जोडीला केले पराभूत 

सौरभ चौधरी आणि मनू भाकर या भारताच्या आघाडीच्या नेमबाजांनाही सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. सौरभ आणि मनूने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीची अंतिम लढत १६-१२ अशी जिंकली. त्यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत जावेद फोरोघी आणि गोलनोश सेबघातोल्लाही या इराणच्या जोडीला पराभूत केले.

First Published on: March 22, 2021 9:51 PM
Exit mobile version