Denmark Open : बलाढ्य यामागूचीचा पराभव करत सायना उपांत्यपूर्व फेरीत

Denmark Open : बलाढ्य यामागूचीचा पराभव करत सायना उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागूचीचा पराभव केला. सायनाला चार वर्षांनंतर यामागूचीवर विजय मिळवण्यात यश आले.

यामागूचीचा सरळ सेटमध्ये पराभव

डेन्मार्क ओपनच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनाने अकाने यामागूचीचा २१-१५, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना ३६ मिनिटे चालला. या सामन्याची सुरूवात सायनासाठी चांगली झाली नाही. सुरूवातीलाच ती ०-४ ने मागे पडली. पण यानंतर तिने चांगला खेळ करत स्कोर १०-१० असा बरोबरीत आणला. पुढे सायनाने अधिकच आक्रमक खेळ करत १९-१२ अशी आघाडी मिळवली. यामागूचीने २०-१५ अशी सायनाची आघाडी कमी केली. पण सायनाने पुढचा गुण मिळवत हा सेट २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या सेटची सुरूवात सायनाने चांगली केली. तिच्याकडे ७-२ अशी मोठी आघाडी होती. पण यामागूचीने पुनरागमन करत स्कोर ११-११ असा बरोबरीत आणला. हा अटीतटीचा सेट पुढेही असाच सुरू राहिला. त्यामुळे या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंत १७-१७ अशी बरोबरी होती. मात्र सायनाने पुढचे चारही गुण मिळवत हा सेट २१-१७ असा जिंकत सामनाही जिंकला.

उपांत्यपूर्व फेरीत नोझोमी ओकूहाराशी सामना

हा सायनचा यामागूचीवरील केवळ दुसरा विजय होता. तर यामागूचीने सायनाला ६ वेळा पराभूत केले आहे. सायनचा यामागूचीवरील पहिला विजय चीन ओपन २०१४ मध्ये आला होता. सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकूहाराशी सामना होईल. मागील महिन्यात झालेल्या कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नोझोमीने सायनाचा पराभव केला होता.
First Published on: October 18, 2018 11:05 PM
Exit mobile version