…आणि धोनीची निवड झाली!

…आणि धोनीची निवड झाली!

महेंद्र सिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा प्रमुख सदस्य बनला. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. त्यामुळे तो भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाजच नाही, तर सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि धोनीची भारतीय संघात निवड कशी झाली याचा किस्सा भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी एका मुलाखतीत सांगितला.

धोनीची निवड कशी झाली हे मी याआधी कधीही सांगितलेले नाही. मी आणि माझा पूर्व विभागाचा (ईस्ट झोन) सहनिवडकर्ता प्रणब रॉय, रणजी करंडकाचा सामना पाहत होतो. त्यावेळी ’झारखंड संघात एक युवा, प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज आहे. त्याची राष्ट्रीय संघात निवड होऊ शकते’, असे प्रणब मला म्हणाला.‘तो खेळाडू या सामन्यात यष्टीरक्षण करत आहे का’, असे मी प्रणबला विचारले.

यावर ’नाही, तो फाईन लेगवर क्षेत्ररक्षण करत आहे’, असे प्रणबने उत्तर दिले. त्यानंतर मी धोनीच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीवर नजर टाकली. त्याने फारच सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मी त्याला यष्टिरक्षण करताना पाहिले नव्हते. मात्र, असे असतानाही मी राष्ट्रीय संघासाठी त्याचे नाव सुचवले आणि पुढे काय घडले हे तुम्हाला ठाऊकच आहे, असे किरमाणी म्हणाले. धोनीने डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

First Published on: June 10, 2020 5:37 AM
Exit mobile version