धोनी शांतपणे निवृत्ती घेईल!

धोनी शांतपणे निवृत्ती घेईल!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे ३८ वर्षीय धोनीच्या भविष्याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. धोनीने पुनरागमन अशक्य आहे असे अनेकांना वाटते. मात्र, यावर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार असून धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर या स्पर्धेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता कमीच आहे, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना वाटते.

टी-२० विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात स्थान मिळाले तर मला आनंद होईल. मात्र, भारतीय संघ आता भविष्याचा विचार करत आहे. त्यामुळे त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. धोनी मोठी घोषणा करणारा व्यक्ती नाही. त्यामुळे तो शांतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असा माझा अंदाज आहे, असे गावस्कर म्हणाले.

याआधी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही असेच मत व्यक्त केले होते. रिषभ पंत आणि लोकेश राहुल हे यष्टीरक्षक-फलंदाज फॉर्मात आहेत. खासकरुन राहुलने मागील काही सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशात धोनीला संघात जागा आहे कुठे?, असे सेहवाग म्हणाला होता. सेहवागचा माजी सहकारी वसिम जाफर मात्र याच्याशी सहमत नव्हता. धोनी जर फिट असेल आणि चांगल्या फॉर्मात असले, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. यष्टींच्या मागे आणि फलंदाजीत अखेरच्या षटकांत तो अजूनही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे जाफरने ट्विटमध्ये लिहिले होते.

मुश्ताक अली स्पर्धेचा दर्जा सुधारा!

करोनाचा धोका लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे सुनील गावस्कर यांनी कौतुक केले. मात्र, आयपीएल स्पर्धेत परदेशी खेळाडू असलेच पाहिजेत, अन्यथा ही स्पर्धा मुश्ताक अली स्थनिक टी-२० स्पर्धेसारखी होईल असे म्हणणार्‍या बीसीसीआयच्या अधिकार्‍याला गावस्कर यांनी सुनावले. परदेशी खेळाडूंमुळे आयपीएलची उत्सुकता नक्कीच वाढते. परंतु, बीसीसीआयने ही स्पर्धा मुश्ताक अली स्पर्धेप्रमाणे होत नाही हे पाहिले पाहिजे, हे बीसीसीआयच्या अधिकार्‍याचे विधान अतिशय मूर्खपणाचे आहे. सर्वात आधी, या स्पर्धेला ज्या महान व्यक्तीचे नाव दिले आहे, त्याचा तुम्ही अनादर करत आहात. तसेच या स्पर्धेचा दर्जा सुधारा. केवळ परदेशी खेळाडूंचा समावेश नाही म्हणून मुश्ताक अली स्पर्धेचा दर्जा खालावत नाही, तर या स्पर्धेत भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत नाहीत. बीसीसीआयने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे गावस्कर म्हणाले.

First Published on: March 21, 2020 5:56 AM
Exit mobile version