मॅराडोना यांनी दिला होता फुटबॉलच्या आकाराचा केक कापण्यास नकार!

मॅराडोना यांनी दिला होता फुटबॉलच्या आकाराचा केक कापण्यास नकार!

दिएगो मॅराडोना

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांची फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. त्यांच्या निधनाने फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला. फुटबॉल आणि मॅराडोना यांच्यातील नाते वेगळेच होते. मैदानाबाहेर मॅराडोना यांची प्रतिमा फारशी चांगली नव्हती. परंतु, मैदानात उतरल्यावर फुटबॉल जवळ येताच मॅराडोना यांचे वेगळेच रूप पाहायला मिळायचे. ते जणू जादूगार असल्याप्रमाणे फुटबॉलशी खेळायचे. मॅराडोना यांचे फुटबॉलवर किती प्रेम होते याबाबतची आठवण भारताचे माजी फुटबॉलपटू आयएम विजयन यांनी सांगितली.

मॅराडोनासाठी फुटबॉलचे काय महत्व होते, हे मी २०१२ मध्ये कन्नूर (केरळ) येथे पाहिले. एका कार्यक्रमात मॅराडोना येणार म्हणून खास केक बनवण्यात आला होता. मध्ये फुटबॉल आणि त्याच्या सभोवती मैदान असा त्या केकचा आकार होता. मॅराडोना यांनी फुटबॉलच्या आकाराचा तो केक कापण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी केवळ बाजूने थोडासा केक कापला. त्यांच्यासोबत मला दोन मिनिटे फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली. तो माझ्या आयुष्यातील आजपर्यंतचा सर्वात महत्वाचा क्षण आहे, असे विजयन म्हणाले. मॅराडोना यांचे निधन झाले असले तरी माझ्यासारख्या फुटबॉलपटूंच्या मनात ते कायमच जिवंत राहतील, असे म्हणत विजयन यांनी मॅराडोना यांना आदरांजली वाहिली.

First Published on: November 26, 2020 8:23 PM
Exit mobile version