टीम इंडियाला परदेशातही हरवणे अवघड – साऊथी

टीम इंडियाला परदेशातही हरवणे अवघड – साऊथी

साऊथी

भारतीय संघ परदेशातही दिवसेंदिवस चांगला खेळ करत असून त्यांना हरवणे फार अवघड आहे, असे मत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीने व्यक्त केले. भारताविरुद्ध टी-२० मालिकेच्या पहिल्या दोन लढतीत न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. खासकरून दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने फारच निराशजनक कामगिरी केली.

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला १३२ धावांवर रोखले, तर भारतीय फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या १७.३ षटकांत ७ विकेट राखून पूर्ण केले. त्यामुळे न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बुधवारी होणारा तिसरा टी-२० सामना जिंकणे अनिवार्य आहे. मात्र, भारताला पराभूत करणे सोपे जाणार नाही असे साऊथीला वाटते.

भारताने पहिल्या दोन सामन्यांत चांगला खेळ केला. त्यांच्या संघात खूपच अप्रतिम खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यात आम्ही त्यांना झुंज दिली, पण दुसर्‍या सामन्यात आमचा खेळ खालावला. या सामन्यात आम्ही फारच निराशजनक खेळ केला. भारताविरुद्ध खेळणे आणि जिंकणे नेहमीच अवघड असते. त्यांचा संघ परदेशातही दिवसेंदिवस चांगला खेळ करत आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळच करावा लागेल, असे साऊथी तिसर्‍या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला.

हे ठरेल आमच्यासाठी फायदेशीर!
भारत-न्यूझीलंड मालिकेतील पहिले दोन टी-२० सामने ऑकलंडला झाले, तर तिसरा सामना हॅमिल्टनला होणार आहे. हा सामना वेगळ्या ठिकाणी होणे न्यूझीलंडसाठी फायदेशीर ठरू शकेल, असे साऊथीला वाटते. याबाबत त्याने सांगितले, हा सामना वेगळ्या ठिकाणी होणार आहे आणि याचा आम्हाला फायदा होऊ शकेल. आम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. मात्र, आम्ही निकालाचा फार विचार करता कामा नये. आम्ही केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला पहिल्या दोन सामन्यांत खूप शिकायला मिळाले. या सामन्यांत केलेल्या चुका पुन्हा न केल्यास आम्ही नक्कीच विजयी होऊ शकतो.

First Published on: January 29, 2020 6:01 AM
Exit mobile version