इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये वृद्धिमानच्या जागी खेळणार दिनेश कार्तिक?

इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये वृद्धिमानच्या जागी खेळणार दिनेश कार्तिक?

दिनेश कार्तिक आणि साहा

टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकिपिंगसाठी भारताच्या टीमची पहिली पसंती ही वृद्धिमान साहा इंग्लंड दौऱ्यातून बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीम इंडियाचा टेस्ट विकेटकिपर असणारा वृद्धिमानला आयपीएलदरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळंच अफगाणिस्तान विरुद्ध खेळलेल्या एकमेव टेस्ट मॅचमध्येदेखील वृद्धिमान खेळू शकला नव्हता. चार – पाच आठवड्यात इंग्लंड दौऱ्यापूर्वी ही दुखापत बरी होईल याचा साहाला विश्वास होता. मात्र त्यानुसार त्याची रिकव्हरी मात्र झालेली नाही. मागच्या आठवड्यातदेखील सॉफ्ट प्लास्टरसह साहा दिसला होता. त्यामुळं १ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये वृद्धिमानचा समावेश होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वृद्धिमान नसल्यास, दिनेश कार्तिकला संधी

वृद्धिमान साहा टेस्ट टीममध्ये न आल्यास, दिनेश कार्तिकला विकेटकिपर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या टेस्ट मॅचसाठीदेखील साहाऐवजी दिनेश कार्तिकची वर्णी लागली होती. त्यामुळं या मॅचमध्येदेखील दिनेश कार्तिकलाच संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या टेस्ट मॅचसाठीदेखील वृद्धिमान फिट झालेला नाही. ही मॅच सोमवार १६ जुलैपासून सुरु झाली आहे. टेस्ट मॅचमध्ये उतरण्यापूर्वी खेळाडूंच्या फिटनेससाठी टीमचे प्रबंधक अतिशय सजगता दाखवत असल्यामुळंच काही टॉप बॅट्समनदेखील इंडिया ए टीममध्ये खेळत आहेत.

साहाची दुखापत अजूनही बरी नाही

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धिमान साहाची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. ही जरी एक बाब असली तरी वृद्धिमान सध्या आऊट ऑफ प्रॅक्टिसदेखील आहे. वास्तविक साहा आपल्या फिटनेससाठी सतत प्रयत्न करत आहे. तरीही त्याला सध्या टेस्ट टीममध्ये ठेवणं कठीण आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत सगळ्या गोष्टींची माहिती असलेल्या दिनेश कार्तिकला संधी देणं योग्य आहे. पहिली टेस्ट मॅच एक ऑगस्टपासून एजबेस्टनमध्ये सुरु होणार आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार खेळू शकणार की नाही याची अजूनही शाश्वती नाही. तर, मोहम्मद शमीनं यो यो टेस्ट पास केली आहे.

First Published on: July 18, 2018 2:09 PM
Exit mobile version