चहलकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका, तो रोबोट नाही !

चहलकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका, तो रोबोट नाही !

मुथैया मुरलीधरनचे मत

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नसारख्या महान लेगस्पिनरलाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्याच अ‍ॅडम झॅम्पाने भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेच्या ४ सामन्यांत ६ विकेट घेतल्या आहेत आणि त्यातच त्याने महेंद्रसिंग धोनीला २ वेळा, तर विराट कोहलीला एकदा बाद केले आहे.

याउलट भारताचा लेगस्पिनर युझवेन्द्र चहल या मालिकेत एकच सामना खेळला आहे आणि त्यात त्याने १० षटकांत ८० धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने चहलची पाठराखण केली आहे. चहलकडून प्रत्येक सामन्यात ५ विकेट घेण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे, तो रोबोट नाही, असे मुरलीधरन म्हणाला.

युझवेन्द्र चहल हा प्रत्येक सामन्यात पाच विकेट घेईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तो चॅम्पियन गोलंदाज आहे आणि त्याने मागील २ वर्षांत सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत वैविध्य आहे. त्यामुळे एका सामन्यात त्याची कामगिरी चांगली होऊ शकली नाही, म्हणून चाहत्यांनी त्याच्यावरील विश्वास कमी करावा हे योग्य नाही. कारण तो रोबोट नाही. प्रत्येक सामन्यात त्याने सर्वोत्तम कामगिरी केलीच पाहिजे, असा दबाव तुम्ही त्याच्यावर टाकणे चुकीचे आहे.

प्रत्येकाने त्याच्यावर टीका करण्याआधी थोडा संयम बाळगावा. त्याने भारतासाठी जवळपास ५० सामने खेळले आहेत. भारतासारख्या चांगल्या संघासाठी तो इतके सामने खेळला आहे, म्हणजे त्याच्यात काहीतरी खास असेलच ना, असे मुरलीधरन म्हणाला.

First Published on: March 13, 2019 4:34 AM
Exit mobile version