दबाव म्हणजे काय माहीत नाही !

दबाव म्हणजे काय माहीत नाही !

भारताचा नेमबाज सौरभ चौधरी

भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने २०१८ या वर्षात खूपच चांगली कामगिरी केली होती. त्याने एशियाड, ज्युनियर ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व चॅम्पियनशिप आणि आशियाई एअरगन या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली होती. त्याच्या या कामगिरीमुळे साहजिकच आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांचा तुला दबाव जाणवतो का असे विचारले असता तो म्हणाला, दबाव म्हणजे का काय असतं मला माहीत नाही.

एखाद्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आले नाही तर मी निराश होत नाही. तुमच्याकडे पुन्हा एक दिवस असतो, पुन्हा एक स्पर्धा खेळण्याची संधी असते, पुन्हा एक सुवर्णपदक मिळवण्याची संधी असते. माझा भर फक्त स्पर्धेत उतरून आपले सर्वोत्तम देण्यावर असतो. मी ज्युनियर ते सिनियर गट हा प्रवास सुरू करून काहीच वेळ झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवले त्यादिवसापासून आज माझ्या सरावात, मी ज्याप्रकारे स्पर्धेसाठी तयारी करतो त्यात काहीही बदल केलेला नाही.

मी एका दिवशी पाच-सहा तास सराव करतो. राष्ट्रीय शिबिर आणि घरी करणार्‍या सरावात खूप फरक आहे, मात्र मी ज्याप्रकारे सराव करतो त्यात काहीही बदल केलेला नाही. मी जर योग्य सराव केला तर त्याचे फळ मला मिळेलच, असे सौरभ म्हणाला.

First Published on: February 11, 2019 4:15 AM
Exit mobile version