Nations League : बेल्जियमवर मात करत इंग्लंड अव्वल स्थानी 

Nations League : बेल्जियमवर मात करत इंग्लंड अव्वल स्थानी 

इंग्लंड फुटबॉल संघ 

मार्कस रॅशफोर्ड आणि मेसन माऊंट यांनी केलेल्या गोलच्या जोरावर इंग्लंडने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात बेल्जियमचा २-१ असा पराभव केला. या विजयासह इंग्लंडने लीग ‘ए’, गट २ मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली. बेल्जियम हा सध्याच्या घडीला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला संघ आहे. तसेच त्यांनी गेल्या १२ सामन्यांत विजय मिळवले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धही त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, इंग्लंडने त्यांचा खेळ उंचावत हा सामना जिंकला. बेल्जियमने २०१८ फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर दोनदा मात केली होती. या पराभवांची परतफेड करण्यातही इंग्लंडला यश आले.

मध्यंतराला १-१ अशी बरोबरी 

या सामन्याची बेल्जियमने चांगली सुरुवात केली. १६ व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूला इंग्लंडच्या इरिक डायरने अयोग्यरीत्या पाडल्याने बेल्जियमला पेनल्टी मिळाली. स्वतः लुकाकूनेच पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत बेल्जियमला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेल्जियमला त्यांची आघाडी वाढवण्याची संधी मिळाली. परंतु, केविन डी ब्रून आणि थॉमस मुनिएर यांना संधीचा फायदा घेता आला नाही. दुसरीकडे मुनिएरच्या चुकीमुळेच ३९ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. यावर रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. ही बरोबरी मध्यंतरापर्यंत राहिली. उत्तरार्धात ६४ व्या मिनिटाला मेसन माऊंटने इंग्लंडची आघाडी दुप्पट करत त्यांना आघाडी मिळवून दिली. यानिक करास्कोला बेल्जियमला बरोबरी करून देता आली असती, पण यात त्याला अपयश आले. त्यामुळे इंग्लंडने हा सामना २-१ असा जिंकला.

 

First Published on: October 12, 2020 8:46 PM
Exit mobile version