IND vs ENG : इंग्लंडला पहिल्या डावात ६०० धावा तरी कराव्या लागणार – रूट

IND vs ENG : इंग्लंडला पहिल्या डावात ६०० धावा तरी कराव्या लागणार – रूट

जो रूट

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक केले. आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या रूटने १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १२८ धावांची खेळी केली. तसेच त्याने सलामीवीर डॉम सिबलीसोबत २०० धावांची भागीदारी रचली. सिबलीने २८६ चेंडूत ८७ धावा केल्या. या दोघांच्या चांगल्या फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ असा सुस्थितीत आहे. मात्र, चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याने इंग्लंडला पहिल्या डावात किमान ६०० धावा कराव्या लागतील, असे मत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर रूटने व्यक्त केले.

खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल

खेळपट्टी सध्या फलंदाजांना अनुकूल आहे. या गोष्टीचा फायदा घेत आम्ही पहिल्या डावात किमान ६०० आणि शक्य असल्यास ७०० धावा करणे आवश्यक आहे. या खेळपट्टीकडून लवकरच गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे पूर्ण दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी काही काळ फलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसे झाल्यास आम्ही भारतावर दबाव टाकू शकतो, असे रूट म्हणाला.

शतक माझ्यासाठी खास

रूटचे हे कसोटी कारकिर्दीतील २० वे आणि सलग तिसरे शतक ठरले. या शतकाबाबत त्याने सांगितले, हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या खेळता काही तांत्रिक बदल केले असून आधी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करत आहे. याचा मला मोठ्या धावा करण्यासाठी फायदा होत असल्याचा आनंद आहे.


हेही वाचा – जो रूटचे शंभराव्या कसोटीत शतक, दिग्गजांच्या यादीत समाविष्ट 


 

First Published on: February 5, 2021 9:15 PM
Exit mobile version