आर्चरचे करायचे काय? इंग्लंड-विंडीज तिसरी कसोटी आजपासून 

आर्चरचे करायचे काय? इंग्लंड-विंडीज तिसरी कसोटी आजपासून 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. विंडीजने साऊथहॅम्पटनला झालेला पहिला कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवली होती, पण दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने दमदार पुनरागमन करत मालिकेत १-१ बरोबरी केली. त्यामुळे दोन्ही संघांचे तिसरा कसोटी सामना जिंकत ही मालिका आपल्या खिशात घालण्याचे लक्ष्य असेल. या सामन्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला खेळवायचे की नाही, असा मोठा प्रश्न इंग्लंडपुढे आहे.

आर्चरवर वर्णभेदी टीका

पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, आर्चरने या कसोटीच्या दुसऱ्या डावात ३ विकेट घेत चांगली कामगिरी केली. मात्र, सामना संपल्यावर तो ब्रायटनला त्याच्या घरी जाऊन आला. दोन्ही संघांच्या खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरण सोडून जाण्याची परवानगी नसताना आर्चरने हे कृत्य केल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले. तिसऱ्या कसोटीत आर्चरचे पुनरागमन अपेक्षित होते, पण पहिल्या कसोटीनंतर काही लोकांनी इंस्टाग्रामवरून त्याच्यावर वर्णभेदी टीका झाली. त्यामुळे ‘पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी मी अजून मानसिकदृष्ट्या तयार नाही,’ असे आर्चर म्हणाला. आता इंग्लंडला तिसऱ्या कसोटीतही आर्चरविनाच खेळावे लागू शकेल.

१९८८ नंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी

दुसरीकडे विंडीजला १९८८ नंतर पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. शमार ब्रूक्स वगळता त्यांच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे ३२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी विंडीजच्या फलंदाजांना, त्यांच्या गोलंदाजांना साथ द्यावी लागेल.
First Published on: July 24, 2020 1:30 AM
Exit mobile version