नव्या इंग्लंडचे विश्वचषकी शिखर सर करण्याचे लक्ष्य

नव्या इंग्लंडचे विश्वचषकी शिखर सर करण्याचे लक्ष्य

इंग्लंड

इंग्लंड या देशानेच जगाला क्रिकेट हा खेळ दिला. मात्र, त्यांनाच विश्वचषक ही या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. इयन बोथम, डेविड गावर, ग्रॅहम गुच, केविन पीटरसन, अँड्रूय फ्लिंटॉफ अशा महान खेळाडूंचा वारसा लाभलेल्या या संघाला विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करण्यात वारंवार अपयश आले आहे. या संघाने पहिल्या ५ विश्वचषकांत किमान उपांत्य फेरी गाठली होती, तर यापैकी ३ वेळा त्यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र, त्यानंतरच्या ६ विश्वचषकांमध्ये त्यांना उपांत्य फेरीचा टप्पाही गाठता आलेला नाही. मागील (२०१५) विश्वचषकात तर त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. त्यामुळे त्या विश्वचषकानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काही कठोर निर्णय घेत बर्‍याच अनुभवी खेळाडूंना संघातून वगळत युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. या बदलांचा संघाच्या निकालांवर सकारात्मक परिणाम झाला. मागील चार वर्षांत या संघाला खूप यश मिळाले आहे आणि त्यामुळेच आपल्या घरच्या मैदानावर होणारा आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, या अपेक्षांच्या दबावात त्यांचा खेळ खालावतो की ते आपला सर्वोत्तम खेळ करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकतात याकडे सार्‍या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

२०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात ६ पैकी ४ साखळी सामने गमावल्यामुळे इंग्लंडला बाद फेरीही गाठण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांनी ईयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वात नवा संघ बांधण्यास सुरुवात केली. पूर्वी कसोटी क्रिकेटवर भर असल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट खेळतानाही या संघाला वेगाने धावा करण्यात अपयश यायचे. मात्र, मॉर्गनने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर या संघातील सलामीवीरांपासून ते अगदी तळाच्या फलंदाजांपर्यंत सर्वांनीच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा संघ सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. या संघाने मागील ४ वर्षांत २३ पैकी १६ एकदिवसीय मालिका जिंकल्या असून याच काळात त्यांनी १८ वेळा ३५० किंवा त्यापेक्षा मोठी धावसंख्या उभारली आहे.

या संघाने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील (४८१) सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. या संघात जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, ईयॉन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली असे अप्रतिम फलंदाज आहेत, जे कोणत्याही संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहेत. तसेच क्रिस वोक्स, लियम प्लंकेट, आदिल रशीद या गोलंदाजांनीही मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, त्यांना टॉम करन आणि जोफ्रा आर्चर हे युवा गोलंदाज कशी साथ देतात, यावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा हा संघ आगामी विश्वचषकात किती यशस्वी होतो हे ठरेल.

जमेची बाजू – इंग्लंड संघाला त्यांच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळेच हा विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या संघाचे ४ फलंदाज जागतिक क्रमवारीत अव्वल २० फलंदाजांमध्ये आहेत. या फलंदाजांनी नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांनी ४ वेळा ३४० धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे या विश्वचषकातही ते मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा आहे. तसेच या संघात बेन स्टोक्स आणि मोईन अलीच्या रूपात दोन उत्कृष्ट अष्टपैलू आहेत. हा विश्वचषक इंग्लंडच्या घरच्या मैदानावर होणार असल्याने त्यांना चाहत्यांचाही भरपूर पाठिंबा मिळणार आहे.

कमकुवत बाजू – इंग्लंडचा सध्याचा संघ हा त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ आहे असे म्हटले जाते. त्यामुळे या संघातील उणीवा शोधणे अवघड आहे. मात्र, संघातील बर्‍याच खेळाडूंना विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नाही. २०१७ मध्ये इंग्लंडमध्येच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याचे याच संघाला प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्य फेरीत पाकिस्तानने पराभूत केल्यामुळे त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरायचे असल्यास त्यांना दबावाच्या परिस्थितीत आपला खेळ उंचावावा लागणार आहे.

विश्वचषकासाठी इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जेम्स विंस, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, लियम डॉसन, मोईन अली, आदिल रशीद, लियाम प्लंकेट, टॉम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.

(खेळाडूवर लक्ष) –

जॉस बटलर [यष्टीरक्षक/फलंदाज]
एकदिवसीय सामने : १२९
धावा : ३४९७
सरासरी : ४१.६३
स्ट्राईक रेट : ११९.८
सर्वोत्तम : १५०

विश्वविजेते – एकदाही नाही

-(संकलन – अन्वय सावंत)

First Published on: May 23, 2019 4:08 AM
Exit mobile version