इंग्लिश प्रीमियर लीग : टॉटनहॅमविरुद्ध चेल्सी विजयी

इंग्लिश प्रीमियर लीग : टॉटनहॅमविरुद्ध चेल्सी विजयी

ऑलिव्हिएर जिरुड आणि मार्कोस अलोन्सोच्या गोलच्या जोरावर चेल्सीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात टॉटनहॅमवर २-१ अशी मात केली. या विजयामुळे चेल्सीने प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात आपले चौथे स्थान अधिक भक्कम केले. या सामन्याआधी दोन संघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक होता. मात्र, या विजयामुळे चेल्सीचे २७ सामन्यांत ४४ गुण झाले असून टॉटनहॅमचे २७ सामन्यांत ४० गुण आहेत. जिरुड आणि अलोन्सो या अनुभवी खेळाडूंना यंदाच्या मोसमात फारसे सामने खेळायला मिळालेले नाहीत. मात्र, त्यांनी या सामन्यात गोल करत आपले महत्त्व पुन्हा एकदा दाखवून दिले.

चेल्सीने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. १५ व्या मिनिटाला रॉस बार्कलीने मारलेला फटका गोल पोस्टला लागून जिरुडकडे आला आणि त्याने अप्रतिम फटका मारत गोल केला. हा त्याचा मागील एप्रिलपासून पहिलाच गोल होता. त्याच्या गोलमुळे चेल्सीला १-० अशी आघाडी मिळाली. यानंतर २४ व्या मिनिटाला चेल्सीच्या अलोन्सोला, तर ३६ व्या मिनिटाला टॉटनहॅमच्या टॅनगंगाला गोल करण्याची संधी मिळाली, पण याचा त्यांना फायदा घेता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला चेल्सीने आपली आघाडी कायम राखली.

उत्तरार्धातही चेल्सीने आक्रमक खेळ सुरु ठेवला आणि याचा फायदा त्यांना ४८ व्या मिनिटाला मिळाला. बार्कलीच्या पासवर अलोन्सोने गोल करत चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढे टॉटनहॅमचे प्रशिक्षक जोसे मौरिन्हो यांनी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंपैकीच एक असणार्‍या एरीक लमेलाने मारलेला फटका चेल्सीचा बचावपटू अँटोनियो रुडिगाच्या पायाला लागून गोलमध्ये गेला. यानंतर मात्र टॉटनहॅमला गोल करता आला नाही आणि चेल्सीने हा सामना २-१ असा जिंकला. दुसरीकडे क्रिस्टल पॅलेसने न्यूकॅसलचा १-० असा पराभव केला. बर्नलीने बॉर्नमथवर ३-० असा, तर साऊथहॅम्पटनने अ‍ॅश्टन विलावर २-० असा विजय मिळवला.

जेसूसचा गोल; मँचेस्टर सिटीचा विजय

गॅब्रियल जेसूसने ८० व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीगच्या सामन्यात लेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात मात्र मँचेस्टरने लेस्टरच्या बचावफळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ६२ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी मिळाली. परंतु, सर्जिओ अग्वेरोला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अखेर रियाद महारेझच्या पासवर जेसूसने गोल करत मँचेस्टर सिटीला हा सामना १-० असा जिंकवून दिला. हा त्यांचा २७ सामन्यांतील १८ वा विजय होता.

First Published on: February 24, 2020 5:14 AM
Exit mobile version