जेसूस, सिल्वाचे गोल; मँचेस्टर सिटीचा विजय

जेसूस, सिल्वाचे गोल; मँचेस्टर सिटीचा विजय

गॅब्रियल जेसूस आणि डेविड सिल्वाने केलेल्या गोलच्या जोरावर गतविजेत्या मँचेस्टर सिटीने इंग्लंडमधील फुटबॉल स्पर्धा प्रीमियर लीगच्या सामन्यात क्रिस्टल पॅलेसवर २-० असा विजय मिळवला. प्रीमियर लीगच्या मागील सामन्यात मँचेस्टर सिटीला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर पॅलेसने मागील ६ पैकी केवळ १ सामना गमावला होता. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी मँचेस्टर सिटीला सर्वोत्तम खेळ करावा लागला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीचे ९ सामन्यांत १९ गुण झाले असून ते गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या लिव्हरपूलचे ८ सामन्यांत २४ गुण आहेत.

पॅलेसविरुद्धच्या सामन्याची मँचेस्टर सिटीने चांगली सुरुवात केली. या सामन्याच्या १७ व्या मिनिटाला जेसूसला गोल करण्याची संधी होती, पण त्याला फटका गोलवर मारता आला नाही. २१ व्या मिनिटाला इकाय गुंडोगनने गोलवर मारलेला फटका पॅलेसचा गोलरक्षक वेन हेनसीने अडवला. अखेर ३९ व्या बर्नार्डो सिल्वाच्या पासवर जेसूसने गोल करत मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतरच कर्णधार डेविड सिल्वाने मँचेस्टर सिटीची आघाडी दुप्पट केली. त्यांनी ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखली. मध्यंतरानंतर रहीम स्टर्लिंगला गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या, पण त्याला याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. ७६ व्या मिनिटाला पॅलेसच्या क्रिस्टियन बेन्टेकेने मारलेला हेडर मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडवार्डोने अडवला. यानंतर पॅलेसच्याच विल्फ्रिड झाहा आणि पॅट्रिक वॅन आंहोल्टलाही गोल करता आला नाही. त्यामुळे मँचेस्टर सिटीने हा सामना २-० असा जिंकला.

दुसरीकडे चेल्सीने न्यूकॅसलचा १-० असा पराभव केला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही, परंतु उत्तरार्धात चेल्सीने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ५६ व्या मिनिटाला स्ट्रायकर टॅमी अब्राहामने अप्रतिम हेडर मारला, पण बॉल गोलपोस्टला लागला. ६८ व्या मिनिटाला क्रिस्टियन पुलिसीचने मारलेला फटका न्यूकॅसलच्या गोलरक्षकाने अडवला, परंतु ७३ व्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल करत चेल्सीला हा सामना १-० असा जिंकवून दिला.

अन्य निकाल :

एव्हर्टन २-० वेस्ट हॅम
अ‍ॅश्टन विला २-१ ब्रायटन
टॉटनहॅम १-१ वॉटफोर्ड
वोल्व्हस १-१ साऊथहॅम्पटन
बॉर्नमथ ०-० नॉर्विच
लेस्टर २-१ बर्नली

First Published on: October 21, 2019 4:20 AM
Exit mobile version