EPL : मँचेस्टर युनायटेड विजयी; प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमवर मात  

EPL : मँचेस्टर युनायटेड विजयी; प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमवर मात  

इडींसन कवानी

मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात टॉटनहॅमवर ३-१ अशी मात केली. हा मँचेस्टर युनायटेडचा ३१ सामन्यांत १८ वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ६३ गुण झाले असून प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात युनायटेडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच वेस्ट हॅमला आपला सामना जिंकण्यात यश आले. त्यांनी लेस्टर सिटीचा ३-२ असा पराभव केला. या सामन्यात वेस्ट हॅमकडून जेसी लिंगार्डने दोन, तर जेराड बोवेनने एक गोल केला. लेस्टरचे दोन्ही गोल केलेची इहीनाचोने केले. मात्र, त्याला इतरांची साथ न मिळाल्याने लेस्टरने हा सामना गमावला.

उत्तरार्धात युनायटेड पिछाडीवर

टॉटनहॅमविरुद्धच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात युनायटेडच्या इडींसन कवानीने गोल केला. मात्र, तो वादग्रस्तरीत्या रद्द करण्यात आला. त्यानंतर लगेचच सॉन ह्युंग मिनने गोल केल्याने मध्यंतराला टॉटनहॅमकडे १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र युनायटेडने अधिक आक्रमक खेळ केला. फ्रेडने ५७ व्या मिनिटाला गोल करत युनायटेडला १-१ अशी बरोबरी करून दिली. ७९ व्या मिनिटाला मेसन ग्रीनवूडच्या पासवर कवानीने गोल करत युनायटेडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर ग्रीनवूडने आणखी एक गोल केल्याने युनायटेडने हा सामना ३-१ असा जिंकला. तसेच न्यूकॅसलने बर्नलीला २-१ असे पराभूत केले.

First Published on: April 12, 2021 10:45 PM
Exit mobile version