इंग्लंड-क्रोएशिया घमासान !

इंग्लंड-क्रोएशिया घमासान !

क्रोएशिया वि इंग्लड

इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील फुटबॉल विश्वचषकाचा उपांत्य फेरीतील सामना आज रंगणार आहे. इंग्लंड यापूर्वी १९६६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. तर क्रोएशियाला अजून विश्वचषक जिंकता आलेला नाही. क्रोएशिया याआधी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही कधी खेळलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला नमवून ते अंतिम सामन्यात पोहोचण्यास उत्सुक असणार.

इंग्लंडने या विश्वचषकात अनपेक्षित कामगिरी केलेली आहे. ते या टप्प्यापर्यंत पोहोचतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांनी या स्पर्धेत फक्त १ सामना गमावला आहे. गटफेरीत त्यांना बेल्जियमने पराभूत केले होते. याचा काहीसा त्यांना फायदाच झाला आहे. गटफेरीत दुसरे स्थान मिळाल्याने त्यांना बाद फेरीत कोलंबिया आणि स्वीडनविरुद्ध सामने खेळायला मिळाले. कोलंबियाच्या सामन्यात त्यांचा स्टार खेळाडू जेम्स रोड्रिगेस खेळू शकला नव्हता. याचा फायदा घेत इंग्लंडने हा सामना पेनल्टी शूटआऊटवर जिंकला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा स्वीडनशी सामना झाला. तोही सामना इंग्लंड अगदी आरामात २-० असा जिंकला. इंग्लंडकडून त्यांचा स्टार स्ट्रायकर आणि कर्णधार हॅरी केन याने या विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल केले आहेत. त्यामुळे इंग्लंडला त्याच्याकडून या सामन्यातही चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

तर दुसरीकडे क्रोएशियानेही या विश्वचषकात उत्तम प्रदर्शन केले आहे. त्यांनी या स्पर्धेत त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत. गट फेरीत अर्जेन्टिनासारखा संघ असतानाही त्यांनी गुण तक्त्यात अवल स्थान पटकावले होते. असे असले तरी बाद फेरीतील त्यांचा प्रवास कठीण राहिला आहे. त्यांना बाद फेरीतील दोन्ही सामने जिंकायला पेनल्टी शूटआऊटची गरज पडली होती. बाद फेरीत पहिल्या सामन्यात डेन्मार्कला तर दुसर्‍या सामन्यात यजमान रशियाला त्यांनी पराभूत केले होते. क्रोएशियाकडून त्यांचा कर्णधार लुका मॉड्रीच याने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याला त्याचा मधल्या फळीतील सहकारी एवान रॅकटीच यानेही चांगली साथ दिली आहे. क्रोएशियाच्या संघाने एकूणच चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील हा उपांत्य फेरीतील सामना कोण जिंकेल हे ठरवणे अवघड आहे. परंतु, हा सामना मनोरंजक होईल यात शंका नाही.

First Published on: July 11, 2018 4:02 PM
Exit mobile version