फ्रान्सला फायनल चान्स; बेल्जियमशी उपांत्य फेरीतील सामना आज

फ्रान्सला फायनल चान्स; बेल्जियमशी उपांत्य फेरीतील सामना आज

  इडन हझार्ड, किलियन एम्बापे

बेल्जियम विरुद्ध फ्रान्स हा उपांत्य फेरीतील सामना आज होणार आहे. २००६ मधील विश्वचषक जिंकल्यानंतर फ्रान्सची या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिली खेप आहे. तर बेल्जियमने १९८६ विश्वचषकानंतर पहिल्यांदाच इतक्या लांबपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या देशासाठी नवा फुटबॉल इतिहास रचण्याची संधी आहे.

दोन्ही संघाचा अप्रतिम खेळ 

बेल्जियम आणि फ्रान्स या दोन्ही संघांनी या फुटबॉल विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. फ्रान्सने गट फेरीत एकही सामना न गमावता बाद फेरीत प्रवेश केला होता. बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात त्यांनी अर्जेन्टिनाला रंगतदार सामन्यात ४-३ तर उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेला २-० असे नमवले होते. फ्रान्सकडून १९ वर्षीय किलियन एम्बापेने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला आहे. तर त्यांचे इतर स्टार खेळाडू ग्रीझमन, पोग्बा आणि कांटे यांनी आपला खेळ योग्य क्षणी उंचावला आहे. तसेच उरुग्वेविरुद्ध गोल करून राफेल वरान यानेही आपले महत्व दाखवून दिले आहे. एकूणच फ्रान्सचा संघ या विश्वचषकात आत्मविश्वासाने खेळतो आहे.

सामना ठरणार रंजकदार 
तर दुसरीकडे बेल्जियमनेही आपल्या खेळात सातत्य राखले आहे. या विश्वचषकात त्यांनी अजून एकही सामना गमावलेला नाही. तसेच त्यांनी अवघड प्रतिस्पर्ध्यांना सहजतेने हरवले आहे. गट फेरीत इंग्लंड, बाद फेरीच्या पहिल्या फेरीत जपान तर उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ब्राझीलला देखील पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिलकडून बेल्जियम पराभूत होईल अशी अपेक्षा होती, मात्र बेल्जियमने दमदार खेळ करून ब्राझिलला २-१ असे पराभूत करत त्यांना विश्वचषकाबाहेर काढले. बेल्जियमचे स्टार खेळाडू इडन हझार्ड, केविन डी ब्रून आणि रोमेलू लुकाकू यांनी या विश्वचषकात उत्तम प्रदर्शन केले आहे. त्यामुळे आता या दोन्ही फॉर्ममध्ये असलेल्या संघांचा उपांत्य फेरीतील हा सामना रंजकदार ठरणार यात शंका नाही.

First Published on: July 10, 2018 6:30 AM
Exit mobile version