माजी राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार यांचे निधन

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार यांचे निधन

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग ११ वर्षे भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारे कबड्डीपटू अमर पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अमर पवार यांनी वडील राजाराम पवार आणि काका शिवराम पवार यांच्याप्रमाणेच ‘अमर भारत’ संघाकडून कबड्डीचे धडे गिरवले. त्यांचे वडील राजाराम यांनी पाच वेळा महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते, तर काका शिवराम हे भारतीय व मध्य रेल्वेकडून खेळले होते.

उत्कृष्ट चढाईपटू अशी ख्याती

अमर पवार यांनी महिंद्रा, एअर इंडिया यांसारख्या नावाजलेल्या कंपन्याकडून आलेली संधी सोडून काकांच्या मध्य रेल्वे संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. उत्कृष्ट चढाईपटू अशी त्यांची ख्याती होती. रेल्वे संघाकडून खेळताना अमर यांनी खेळाडू व संघनायक म्हणून चुणूक दाखवली. त्यानंतर ते या संघाचे प्रशिक्षकही होते. तसेच १५ वर्ष ते मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य होते. त्यांनी निवड समिती सदस्य, प्रशिक्षक व व्यवस्थापक आदी भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. मुंबई विद्यापीठ संघाचे निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. कबड्डीला दिलेल्या या योगदानाबद्दल मागील वर्षी त्यांना ओम् कबड्डी प्रबोधिनीने ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.

First Published on: September 3, 2020 8:48 PM
Exit mobile version