फ्रान्स जगज्जेता

फ्रान्स जगज्जेता

फ्रान्सचा संघ विजयोत्सव साजरा करताना

क्रोएशियाचा ४-२ असा धुव्वा उडवत फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. फ्रान्सने दुसऱ्यांदा असा पराक्रम केला आहे. यापूर्वी १९९८ मध्ये त्यांनी बाजी मारली होती. सामन्याच्या सुरुवातीला क्रोएशियाने फ्रान्सच्या बचावफळीवर दबाव टाकला. मात्र, १८ व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री किक मिळाली, ज्यावर क्रोएशियाच्या मारिओ मांजुकीचने स्वयंगोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. याचा फायदा त्यांना २८ व्या मिनिटाला मिळाला. इवान पेरेसिचने अप्रतिम गोल करत क्रोएशियाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. यानंतर ३८ व्या मिनिटाला फ्रान्सला व्हीएआरच्या वापरामुळे पेनल्टी मिळाली. ज्यावर फ्रान्सचा स्टार ग्रीझमनने गोल करत फ्रान्सला २-१ ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फ्रान्सला मध्यंतरापर्यंत ठेवण्यात यश आले.

उत्तरार्धात फ्रान्सने चांगली सुरुवात करत ५९ व्या मिनिटाला आपली आघाडी आणखी वाढवली. पोग्बाने हा गोल केला. तर ६५ व्या मिनिटाला किलियन एम्बापेने गोल करत फ्रान्सची आघाडी ४-१ अशी केली. मात्र, क्रोएशियाने प्रतिउत्तर दिले. ६९ व्या मिनिटाला मांजुकीचने गोल करत फ्रान्सची आघाडी कमी केली. यानंतर क्रोशियाला गोल करायच्या काही संधी मिळाल्या. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले.

First Published on: July 15, 2018 11:29 PM
Exit mobile version