French Open : दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदाचा होता विश्वास; जोकोविचला दमदार कामगिरीचा आनंद

French Open : दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदाचा होता विश्वास; जोकोविचला दमदार कामगिरीचा आनंद

नोवाक जोकोविचने पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद

अंतिम सामन्यात पहिले दोन गमावले असले, तरी दमदार पुनरागमन करून जेतेपद पटकावण्याचा विश्वास कायम होता, असे उद्गार फ्रेंच ओपन स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकल्यावर नोवाक जोकोविचने काढले. जोकोविचने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासवर ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी मात करत फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले. हे त्याचे कारकिर्दीतील १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. तसेच चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन वेळा जिंकणारा जोकोविच ५२ वर्षांतील पहिला पुरुष टेनिसपटू ठरला.

क्षमतेवर विश्वास ठेवला

मागील ४८ तासांत ९ तास मी दोन उत्कृष्ट टेनिसपटूंविरुद्ध सामने खेळलो. शारीरिकदृष्ट्या मागील तीन दिवस फार अवघड होते. परंतु, मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला. अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतरही दमदार पुनरागमन करून जेतेपद पटकावण्याचा मला विश्वास होता, असे जोकोविच म्हणाला. जोकोविचने उपांत्य फेरीत १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालवर मात केली होती. हा सामना चार तास तासांहूनही अधिक वेळ चालला, तर त्सीत्सीपास आणि जोकोविच यांच्यातील अंतिम सामना साडे चार तासांहून अधिक वेळ चालला.

फेडरर, नदालचा विक्रम मोडण्याची संधी

जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून आपले १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम सध्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या नावे असून या दोघांनाही २०-२० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. परंतु, जोकोविचला त्यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जोकोविच हा नदालपेक्षा एका वर्षाने, तर फेडररपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.

First Published on: June 14, 2021 8:14 PM
Exit mobile version