French Open : जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी; नदालवर मात करत अंतिम फेरीत

French Open : जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी; नदालवर मात करत अंतिम फेरीत

नदालवर मात करत जोकोविच अंतिम फेरीत

‘क्ले कोर्ट’चा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करणे हे अशक्यप्राय आव्हान मानले जाते. परंतु, नोवाक जोकोविचने अशक्य ते शक्य करून दाखवत फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने उपांत्य फेरीत १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या नदालचा ३-६, ६-३, ७-६, ६-२ असा पराभव केला. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत हा नदालचा पहिला पराभव ठरला. याआधी उपांत्य फेरीत त्याला १३ पैकी १३ सामने जिंकण्यात यश आले होते. तसेच फ्रेंच ओपनमध्ये १६ वर्षे आणि १०८ सामन्यांत नदालची ही पराभूत होण्याची केवळ तिसरी वेळ होती.

तिसरा सेट दीड तासांहून अधिक वेळ 

जोकोविच आणि नदाल यांच्यातील हा एकूण ५८ वा सामना होता. या सामन्याच्या सुरुवातीला नदालने चांगला खेळ केला. त्याने पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र जोकोविचने दमदार पुनरागमन करत ६-३ अशी बाजी मारली. त्यानंतर तिसरा सेट अत्यंत चुरशीचा झाला. दीड तासांहून अधिक वेळ चाललेला हा सेट जोकोविचने टाय-ब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. अखेर चौथ्या सेटमध्ये ६-२ अशी बाजी मारत जोकोविचने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याच्यापुढे स्टेफानोस त्सीत्सीपासचे आव्हान असेल.

१९ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची संधी 

मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात नदालने जोकोविचचा पराभव केला होता. परंतु, जोकोविचला त्या पराभवाची परतफेड करण्यात यश आले. फ्रेंच ओपनमध्ये नदालला दोनदा पराभूत करणारा तो एकमेव खेळाडू आहे. जोकोविचला आता रविवारच्या अंतिम सामन्यात आपले १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी आहे.

First Published on: June 12, 2021 3:07 PM
Exit mobile version