French Open : त्सीत्सीपास अंतिम फेरीत; झ्वेरेवचा पाच सेटमध्ये केला पराभव 

French Open : त्सीत्सीपास अंतिम फेरीत; झ्वेरेवचा पाच सेटमध्ये केला पराभव 

स्टेफानोस त्सीत्सीपास अंतिम फेरीत

ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो ग्रीसचा पहिला टेनिसपटू ठरला. त्याने उपांत्य फेरीच्या रंगतदार सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ असा पाच सेटमध्ये पराभव केला. आता अंतिम फेरीत त्याचा राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. २२ वर्षीय त्सीत्सीपासने आतापर्यंत नदालविरुद्ध केवळ दोन सामने जिंकले असून सात सामने गमावले आहेत, तर जोकोविचविरुद्ध त्याने दोन सामने जिंकले असून पाच सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल.

पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

त्सीत्सीपासने उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवचा ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ असा पराभव केला. या सामन्याची चांगली सुरुवात करताना त्सीत्सीपासने पहिले दोन सेट ६-३, ६-३ असे जिंकले. परंतु, झ्वेरेवने दमदार पुनरागमन करत पुढील दोन सेट ६-४, ६-४ असे जिंकल्याने सामना पाचव्या सेटमध्ये गेला. या सेटमध्ये झ्वेरेवची सर्व्हिस मोडत त्सीत्सीपासने ३-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला आणि पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

First Published on: June 11, 2021 11:25 PM
Exit mobile version