’तसा’ चेंडू पुन्हा या मोसमात टाकला जाणार नाही

’तसा’ चेंडू पुन्हा या मोसमात टाकला जाणार नाही

रबाडा

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कागिसो रबाडाने अप्रतिम गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताला सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११ धावांचे आव्हान होते. मात्र, रबाडाने अप्रतिम यॉर्कर टाकल्यामुळे कोलकाताला ७ धावाच करता आल्या. या सुपर ओव्हरमध्ये त्याने यॉर्करवरच आंद्रे रसेलला बाद केले. त्याने रसेलला टाकलेला तो चेंडू फारच अप्रतिम होता आणि तसा चेंडू या मोसमात पुन्हा टाकला जाणार नाही, असे दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार सौरव गांगुली सामन्यानंतर म्हणाला.

कागिसो रबाडाने सुपर ओव्हरमध्ये ज्याप्रकारे गोलंदाजी केली, खासकरून त्याने आंद्रे रसेलला ज्या चेंडूवर बाद केले, तो फारच अप्रतिम होता आणि तसा चेंडू पुन्हा या मोसमात टाकला जाईल असे मला वाटत नाही. इतक्या फॉर्मात असलेल्या रसेलला तसा चेंडू टाकणे हे अविश्वसनीयच होते, असे गांगुली म्हणाला.

तसेच गांगुलीने पुढे सांगितले, आमच्या संघासाठी हा विजय महत्त्वाचा होता. मागील वर्षी दिल्लीला चांगली कामगिरी करता आली नाही. असे विजय मिळवल्याने संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे. हा मोसम खूप मोठा आहे, मात्र असा विजय मिळवणे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.

यॉर्कर सर्वोत्तम पर्याय – रबाडा

सुपर ओव्हरमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर रबाडा म्हणाला, ते षटक टाकण्याआधी मी विचार केला की या खेळपट्टीवर सर्वोत्तम पर्याय काय असेल ? मी बाऊंसर टाकू शकतो, स्लोवर बॉल टाकू शकतो, पण जर ते चेंडू योग्य ठिकाणी पडले नाहीत, तर ते धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे मला वाटले की सुपर ओव्हरमध्ये यॉर्कर टाकणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. दुसर्‍या एखाद्या दिवशी मी कदाचित यॉर्कर टाकले नसते.

First Published on: April 1, 2019 4:13 AM
Exit mobile version