IPL 2020 : शिखर धवनची ‘ही’ कामगिरी कौतुकास्पद – गंभीर 

IPL 2020 : शिखर धवनची ‘ही’ कामगिरी कौतुकास्पद – गंभीर 

शिखर धवन 

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने यंदाच्या आयपीएल मोसमात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १२ सामन्यांत ५२.३३ च्या सरासरीने ४७१ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच त्याने सलग दोन शतकेही केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद १०१ आणि पुढच्याच सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद १०६ धावांची खेळी केली होती. आयपीएल स्पर्धेत सलग दोन सामन्यांत शतके करणारा धवन हा पहिलीच फलंदाज ठरला. त्यामुळे भारत आणि दिल्लीचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने शिखर धवनचे कौतुक केले आहे.

धवनने त्याचा खेळ उंचावला

धवनने सलग दोन आयपीएल सामन्यांत शतके केली. त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. सलग दोन शतके, तेही टी-२० क्रिकेटमध्ये. धवनच्या या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे गंभीर म्हणाला. या दोन शतकांची विशेष गोष्ट म्हणजे ही शतके अगदी योग्य वेळी आली. दिल्ली कॅपिटल्स संघाने जेव्हा चांगली कामगिरी करणे गरजेचे होते, तेव्हा धवनने त्याचा खेळ उंचावला आणि शतके केली. तुमचा सर्वात अनुभवी फलंदाज महत्त्वाच्या क्षणी फॉर्मात असेल, तर त्यासारखी दुसरी गोष्ट आहे. याचा दिल्ली कॅपिटल्सला नक्कीच फायदा होईल, असेही गंभीरने सांगितले. धवनने आयपीएलच्या मागील मोसमातही दमदार कामगिरी केली होती. त्याने १६ सामन्यांत ३४.७३ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या होत्या. तो दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

 

First Published on: October 27, 2020 10:04 PM
Exit mobile version