गौतमची हॅटट्रिक; भारत ‘अ’ला आघाडी

गौतमची हॅटट्रिक; भारत ‘अ’ला आघाडी

गौतमची हॅटट्रिक

ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतमने घेतलेल्या ६ विकेट्समुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसर्‍या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत ‘अ’ संघाला पहिल्या डावात आघाडी मिळाली. गौतमने विंडीज ‘अ’ संघाच्या अखेरच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूवर माघारी पाठवत हॅटट्रिक मिळवली. भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात केलेल्या २०१ धावांचे उत्तर देताना विंडीज ‘अ’ संघाला १९४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारत ‘अ’ संघाला पहिल्या डावात ७ धावांची आघाडी मिळाली.

या सामन्यात भारत ‘अ’ संघाने कर्णधार हनुमा विहारी (५५) आणि वृद्धिमान साहा (६२) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे पहिल्या डावात २०१ धावा केल्या. याचे उत्तर देताना विंडीज ‘अ’ संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी अवघ्या ३६ धावांतच ३ विकेट्स गमावल्या. मात्र, यानंतर युवा जेरेमी सोलोझानो आणि सुनील अँब्रिस यांनी ६६ धावांची भागीदारी करत विंडीज ‘अ’चा डाव सावरला, पण मुंबईकर शिवम दुबेने अँब्रिसला ४३ धावांवर पायचीत करत ही जोडी फोडली.

सोलोझानोने मात्र एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. त्याला जर्मेन ब्लॅकवूड (२२) आणि यानिक कॅरी (१७) यांनी काही काळ साथ दिली. मात्र, गौतमच्या फिरकीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि विंडीज ‘अ’चा पहिला डाव १९४ धावांवर आटोपला. भारत ‘अ’कडून गौतमने ६७ धावांत ६, तर उमेश यादवने २९ धावांत २ बळी घेतले. भारत ‘अ’ संघाच्या दुसर्‍या डावाची खराब सुरुवात झाली. दुसर्‍या दिवसअखेर त्यांची ३ बाद २३ अशी अवस्था होती.

संक्षिप्त धावफलक –

भारत ‘अ’ : २०१ आणि ३ बाद २३ (नदीम नाबाद ५; चेमार होल्डर २/१४) वि. वेस्ट इंडिज ‘अ’ : १९४ (जेरेमी सोलोझानो ६९, सुनील अँब्रिस ४३; कृष्णप्पा गौतम ६/६७, उमेश यादव २/२९).

First Published on: August 9, 2019 4:25 AM
Exit mobile version