चांगल्या खेळाचे श्रेय मुलीला!

चांगल्या खेळाचे श्रेय मुलीला!

सामनावीर रोहितचे उद्गार

क्रिकेट विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने अप्रतिम शतक ठोकत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला या स्पर्धेत दुसर्‍यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात रोहितने नाबाद १२२ धावांची खेळी केली होती, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५७ धावा केल्या. विश्वचषकाआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ सामन्यांत अर्धशतके केली होती. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ५ वेळा किमान अर्धशतकी खेळी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. या चांगल्या फॉर्मचे श्रेय त्याने आपल्या मुलीला दिले.

मी सध्या खूप चांगल्या मनस्थितीत आहे. माझी मुलगी आयुष्यात आल्यापासून मी मानसिकदृष्ठ्या आधीपेक्षा जास्त सक्षम झालो आहे. आयपीएलमध्येही दमदार कामगिरी झाल्यामुळे मी क्रिकेटचा आनंद उपभोगत आहे. या विश्वचषकाची चांगली सुरुवात करणे हे आमचे लक्ष्य होते आणि आमचा संघ योग्य मार्गावर आहे, असे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितने सांगितले.

या सामन्यात हसन अलीच्या गोलंदाजीवर खराब फटका मारून रोहित बाद झाला. तो बाद झाला त्यावेळी ३९वे षटक सुरू होते. त्यामुळे तुझे एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे द्विशतक चुकले असे वाटते का, असे विचारले असता रोहितने सांगितले, मी जेव्हा बाद झालो, तेव्हा स्वतःवर खूप रागावलो होतो. खासकरून मी चुकीचा फटका मारून बाद झाल्याचे मला दुःख होते. खेळपट्टीवर इतका वेळ घालवल्यानंतर तुम्हाला जास्तीतजास्त धावा करायच्या असतात. मात्र, या खेळीदरम्यान मी द्विशतकाच अजिबातच विचार करत नव्हतो.

पाक फलंदाजांना सल्ला, आता नाही!

पाकिस्तानच्या संघाला या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यांनी पाच पैकी तीन सामने गमावले असून, त्यांना केवळ एक सामना जिंकण्यात यश आले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर रोहित शर्माला पाकिस्तानी पत्रकाराने तू अडचणीत असलेल्या पाकिस्तानी संघाला काय सल्ला देशील?, असा प्रश्न विचारला असता रोहितने मजेशीर उत्तर दिले. मी जेव्हा पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनीन, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देईन, असे रोहित म्हणाला.

First Published on: June 18, 2019 4:19 AM
Exit mobile version