रंगतदार कसोटी सामन्यांसाठी चांगल्या खेळपट्ट्या महत्त्वाच्या!

रंगतदार कसोटी सामन्यांसाठी चांगल्या खेळपट्ट्या महत्त्वाच्या!

सचिन तेंडुलकरची टीका

कसोटी क्रिकेटकडे मागील काही काळात चाहते पाठ फिरवताना पहायला मिळाले आहेत. कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता मिळावी यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. मात्र, या स्पर्धेसोबतच चांगल्या खेळपट्ट्या बनवल्या, तर कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता मिळण्यासाठी मदत होईल, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

रंगतदार कसोटी सामने होण्यासाठी चांगल्या खेळपट्ट्या बनवणे खूप महत्त्वाचे आहे. खेळपट्ट्या जर चांगल्या असतील, तर रटाळ सामने होणार नाहीत. गोलंदाज उत्तम कामगिरी करतील आणि फलंदाजीचा स्तरही वाढेल. चाहत्यांना हेच पहायचे असते. त्यामुळे तुम्ही चांगल्या खेळपट्ट्या बनवल्या, तर चाहते आपोआपच कसोटी क्रिकेट बघायला सुरुवात करतील, असे सचिन म्हणाला.

सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसर्‍या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरचा अधिक उसळी घेतलेला चेंडू ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या मानेला लागला आणि तो जागीच कोसळला. यासारख्या क्षणांमुळे चाहते कसोटी क्रिकेटकडे पुन्हा वळू लागतील, असे सचिनला वाटते. तो म्हणाला, स्मिथला दुर्दैवाने दुखापत झाली. मात्र, कसोटी क्रिकेटसाठी तो क्षण महत्त्वाचा होता, कारण त्याच्यासारख्या महान फलंदाजाला युवा जोफ्रा आर्चरने अडचणीत टाकले. त्यामुळे या सामन्यात रंगत आली आणि चाहत्यांचे लक्ष आपोआपच कसोटी क्रिकेटकडे वळले.

First Published on: August 26, 2019 4:41 AM
Exit mobile version