IND vs AUS : काय बोलावे सुचत नाही – विराट कोहली 

IND vs AUS : काय बोलावे सुचत नाही – विराट कोहली 

भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावातील कामगिरी 

पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला अ‍ॅडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली होती. परंतु, तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आला. धावसंख्येच्या बाबतीत भारताचा हा कसोटीत निच्चांक ठरला. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला. त्यामुळे सामन्यानंतर काय बोलावे हे भारताचा कर्णधार विराट कोहलीला सुचत नव्हते.

भावना शब्दांत मांडणे अवघड आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आमच्याकडे ६० हून अधिक धावांची आघाडी होती, पण त्यानंतर आमचा डाव गडगडला. पहिल्या दोन दिवसांत चांगला खेळ करून सुस्थितीत असताना अचानक तिसऱ्या दिवशी एक तासाचा खराब खेळ तुम्हाला सामना गमावू शकतो. आम्ही तिसऱ्या दिवशी अधिक आक्रमकता दाखवली पाहिजे होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी या डावात पहिल्या डावासारखाच मारा केला. पहिल्या डावात आम्ही धावा करण्याच्या मानसिकतेने खेळलो, पण बहुधा दुसऱ्या डावात आमची मानसिकता बदलली, असे कोहलीने नमूद केले.

कोहलीने या सामन्याच्या पहिल्या डावात ७४ धावांची खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या डावात तो अवघ्या चार धावा करू शकला. आता कोहली पितृत्व रजेवर जाणार असून अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल याची कोहलीला खात्री आहे.

First Published on: December 19, 2020 10:14 PM
Exit mobile version