टायमिंग चुकलेच!

टायमिंग चुकलेच!

महेंद्रसिंग धोनी

“धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप आफ्टर २८ इयर्स”, हे रवी शास्त्रींचे वाक्य भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरु शकणार नाही. वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत भारताने २०११ वर्ल्डकप जिंकला. भारताच्या या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने. धोनीने लसिथ मलिंगा, मुथय्या मुरलीधरन यांसारख्या उत्कृष्ट गोलंदाजांची धुलाई करत ७९ चेंडूत नाबाद ९१ धावांची मॅचविनिंग खेळी केली.आता त्या सामन्याला ९ वर्षे होऊन गेली असली तरी भारताला जिंकण्यासाठी चार धावांची गरज असताना धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार आजही प्रत्येक भारतीयाला लक्षात आहे.

सामन्याचा शेवट षटकार मारुन करण्यात धोनी पटाईत आहे. मात्र, त्याला एका गोष्टीचा शेवट बहुदा आपल्या स्टाईलमध्ये करणे जमलेले नाही आणि ती म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द! निवृत्त कधी व्हायचे हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातील सर्वात अवघड प्रश्न असतो. बऱ्याच खेळाडूंबाबत ‘हा कधी निवृत्त होणार?’, असा प्रश्न विचारला जातो, तर ‘हा इतक्यातच का निवृत्त झाला?’ हा प्रश्न काहींच्याच बाबतीत उपस्थित केला जातो. धोनीने २०१४ मध्ये अचानकच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यावेळी चाहते दुसरा प्रश्न उपस्थित करत होते. परंतु, धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विषय येतो तेव्हा चाहते गोंधळात पडले आहेत, असे म्हणता येईल. आता धोनीसाठी या दोनपैकी नक्की कोणता पर्याय निवडावा हे त्यांना कळत नाही.

महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक. धोनी हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज, तसेच सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. धोनीने मागील १०-१५ वर्षांत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. त्याच्याच नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली. मात्र, तुमची कामगिरी जेव्हा खालावते, तेव्हा सर्वांना या योगदानाचा विसर पडतो. हेच आता धोनीच्या बाबतीतही घडत आहे.

धोनीच्या भविष्याबाबत मागील काही काळात बरीच चर्चा सुरु आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. त्याने काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याला संघाच्या बाहेरच ठेवण्यात आले. त्यामुळे ३८ वर्षीय धोनीची कारकीर्द संपली का? आता त्याचे पुनरागमन होण्याची शक्यताच नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. सध्यातरी म्हणजेच त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या ९ महिन्यांनंतर या प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असेच मिळत आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या आधीही धोनीवर संथ फलंदाजीसाठी बरीच टीका होत होती. धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक आहे असे म्हणणे वावगे ठरु नये. त्याने असंख्य वेळा अशक्यप्राय वाटणारे विजय भारताला मिळवून दिले आहेत. पूर्वी अखेरच्या दोन-तीन षटकांत अगदी ३५-४० धावांचे आव्हानही सहज पार करवून देणाऱ्या धोनीला मागील एक-दोन वर्षांत यापेक्षा निम्म्या धावा करणेही अवघड जात होते. आपल्या ३५० सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत ८७.५७ च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या धोनीने २०१६ वर्षात ८०, २०१७ वर्षात ८५, २०१८ वर्षात ७१ आणि २०१९ वर्षात अवघ्या ८२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामुळे फिनिशर धोनी स्वतःच फिनिश झाला आहे, अशी टीका होऊ लागली.

मागील वर्षी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात २४० धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ९२ अशी बिकट अवस्था होती. मात्र, धोनीने रविंद्र जाडेजाच्या (५९ चेंडूत ७७) साथीने सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. जाडेजा बाद झाला तेव्हा भारताला १३ चेंडूत ३२ धावांची गरज होती. मात्र, ‘फिनिश’ झालेला धोनी अजूनही खेळपट्टीवर असल्याने चाहत्यांना भारताच्या विजयाची आशा होती. परंतु, मार्टिन गप्टिलच्या एका उत्कृष्ट थ्रोने या आशा फोल ठरवल्या. धोनी ५० धावांवर धावचीत झाला आणि भारताने हा सामना १८ धावांनी गमावला. त्यानंतर धोनी पुन्हा भारताच्या निळी जर्सीत दिसलेला नाही.

धोनीच्या जागी भारताने युवा रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, पंतला या संधीचा फारसा उपयोग करता आला नाही. त्यामुळे धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य आहे, असे विधान भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. मात्र, त्यानंतर परिस्थितीत बराच बदल झाला आहे. पंतची जागा आता लोकेश राहुलने घेतली आहे. मागील काही मर्यादित षटकांच्या सामन्यांत राहुलने फलंदाजीसह आपल्या यष्टिरक्षणानेही सर्वांना प्रभावित केले. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर आता यंदाची आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.त्यामुळे धोनीच्या पुनरागमनाच्या आशा आता अधिकच धूसर झाल्या आहेत.

अशक्य असे काहीच नसते, असे म्हटले जाते. मात्र, पुढील एकदिवसीय वर्ल्डकप थेट २०२३ मध्ये होणार आहे आणि तोपर्यंत धोनी खेळणे हे आतातरी अशक्यच वाटते. परंतु, करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर यावर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होईल. या स्पर्धेत धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल असे संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला वाटल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. अन्यथा धोनी निवृत्ती घेण्यासाठी इतका का वेळ घेत आहे, अशी चर्चा होईल हे नक्की.

First Published on: April 19, 2020 2:30 AM
Exit mobile version