भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गिब्ज इच्छुक

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गिब्ज इच्छुक

हर्षल गिब्ज

अनुभवी खेळाडू मिताली राज आणि माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात झालेल्या वादामुळे बीसीसीआयने पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपले अर्ज बीसीसीआयकडे सोपवले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जचाही समावेश आहे. गिब्जसुद्धा भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक बनण्यास इच्छुक आहे.

मनोज प्रभाकरसुद्धा शर्यतीत   

हर्षल गिब्जने द.आफ्रिकेचे ९० कसोटी, २४८ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने नुकतेच २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी कुवेत संघाला प्रशिक्षण दिले होते. या व्यतिरिक्त त्याला प्रशिक्षणाचा अनुभव नाही. हर्षल गिब्जसोबतच माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोर, वेंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज, मनोज प्रभाकर हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये असल्याची चर्चा आहे.

शेवटचा निर्णय विनोद राय यांचा  

प्रशिक्षकपदासाठी  इच्छुक उमेदवार ४ डिसेंबरपर्यंत बीसीसीआयकडे अर्ज करु शकणार आहेत. २० डिसेंबरला भारताचे माजी खेळाडू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेमध्ये अंतिम निर्णय घेणार आहेत.
First Published on: December 9, 2018 10:54 PM
Exit mobile version