टीम इंडियासाठी कायपण!

टीम इंडियासाठी कायपण!

कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास राहुल तयार

भारतीय संघाला आगामी क्रिकेट विश्वचषक जिंकायचा असल्यास चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाने चांगले प्रदर्शन करणे गरजेचे आहे, असे अनेक क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. विश्वचषकासाठी संघ निवडताना निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी अष्टपैलू विजय शंकरला या क्रमांकावर खेळण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, शंकरपेक्षा लोकेश राहुल या क्रमांकासाठी चांगला पर्याय आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरसह अनेकांनी व्यक्त केले आहे. परंतु, याबाबत राहुलने काहीही वक्तव्य केले नव्हते. मात्र, मी भारतीय संघासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे, असे विधान राहुलने शुक्रवारी केले.

मी संघासाठी काहीही करायला तयार आहे. निवड समितीने अगदी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी या संघाचा भाग असून इंग्लंडमध्ये गेल्यावर संघ व्यवस्थापन जे ठरवेल, ते करायला मी तयार आहे, असे राहुल म्हणाला. राहुलची विश्वचषकाच्या संघात राखीव सलामीवीर म्हणून निवड झाली असली तरी त्याने याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर २ वेळा आणि चौथ्या क्रमांकावर ३ वेळा फलंदाजी केली आहे.

राहुलने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये ५३.९०च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या. त्यामुळे तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. याबाबत तो म्हणाला, फॉर्मला आपण जास्तच महत्त्व देतो. फलंदाजीत मागील काही महिने माझ्यासाठी चांगले राहिले आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्ध सामने खेळल्याने मला माझ्या खेळावर काम करण्यासाठी वेळ मिळाला. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत आणि आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे सध्या माझा आत्मविश्वास खूप उंचावला आहे.

मागील काही महिने टी-२० खेळल्यानंतर आता एकदिवसीय क्रिकेट खेळणे आव्हानात्मक असेल का असे विचारले असता राहुलने सांगितले, या दोन प्रकारांमध्ये फार गोष्टी बदलत नाहीत. तुम्हाला दोन्हीमध्ये परिस्थितीनुसारच खेळावे लागते. टी-२०मध्ये तुम्हाला वेगाने विचार करावा लागत असला तरी तुम्ही टी-२० साठी फार योजना आखत नाही. तसेच एकदिवसीय क्रिकेटचेही आहे. तुम्ही मैदानात जाऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन संघाला जशी गरज आहे तशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करता.

खेळात सुधारणा करण्यास द्रविडची मदत झाली

लोकेश राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यातही आले होते. त्यानंतर खेळात सुधारणा करण्यासाठी त्याला भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ’अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची मदत झाली. याबाबत त्याने सांगितले, मी आणि द्रविडने खूप चर्चा केली. माझ्या खेळात फार बदल करण्याची काही गरज नाही, असे आम्हा दोघांनाही वाटले. आता मी फलंदाजी करताना फार विचार न करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुम्ही धावा करत असता तेव्हा तुमचे तंत्र, तुमचा फॉर्म या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात. मात्र, जेव्हा तुमच्या धावा होत नाहीत, तेव्हा तुमच्या खेळात बर्‍याच त्रुटी दिसतात. प्रत्येक खेळाडूलाच यातून जावे लागते.

First Published on: May 18, 2019 11:09 AM
Exit mobile version