IPL 2020 : बुमराह पुढील सामन्यांत दमदार कामगिरी करेल – ग्रॅमी स्वान

IPL 2020 : बुमराह पुढील सामन्यांत दमदार कामगिरी करेल – ग्रॅमी स्वान

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला यंदाच्या आयपीएल मोसमाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सलामीच्या लढतीत १ विकेट घेतली, पण त्यासाठी त्याने ४३ धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर कोलकाताविरुद्ध ३२ धावांत २ विकेट बुमराहने मिळवल्या होत्या. बंगळुरूविरुद्ध त्याने ४२ धावा खर्ची केल्या होत्या. मात्र, त्याला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात यश आले. त्याने या सामन्यात केवळ १८ धावांत २ विकेट मिळवल्या. त्यामुळे तो पुन्हा फॉर्मात येत असल्याची चिन्हे असून पुढील सामन्यांत बुमराह दमदार कामगिरी करेल याचा इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानला विश्वास आहे.

त्याने स्वतःला सिद्ध केले

बुमराहला सुरुवातीच्या सामन्यांत चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. सर्वोत्तम खेळाडूंचाही आत्मविश्वास कधीतरी कमी होऊ शकतो आणि हेच बहुधा बुमराहच्या बाबतीत घडले होते. मात्र, त्याने पंजाबविरुद्ध त्याच्यातील प्रतिभा दाखवून दिली. तो अजूनही किती उत्कृष्ट गोलंदाज आहे हे त्याने दाखवले. त्याने पुन्हा स्वतःला सिद्ध केले. तो आता फॉर्मात आला आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यांतही तो अशीच दमदार कामगिरी करेल याची मला खात्री आहे, असे स्वान म्हणाला.

रोहित मुंबईसाठी सर्वात महत्त्वाचा

पंजाबविरुद्ध मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ७० धावांची खेळी केली. हे त्याचे चार सामन्यांतील दुसरे अर्धशतक ठरले. रोहितने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे, कारण तो या संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे स्वान म्हणाला. रोहित मुंबईसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फॉर्मात असताना त्याची फलंदाजी पाहताना खूप मजा येते. तो आता ५-१० वर्षांपूर्वीइतका फिट नसला, तरी धावा कशा करायच्या हे त्याला अजूनही ठाऊक आहे, असे स्वानने सांगितले.

First Published on: October 2, 2020 6:49 PM
Exit mobile version