ICC Test Ranking : जो रूटला मागे टाकत मार्नस लाबुशाने टॉपवर; विराट कोहलीचे मोठे नुकसान

ICC Test Ranking : जो रूटला मागे टाकत मार्नस लाबुशाने टॉपवर; विराट कोहलीचे मोठे नुकसान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (ICC) बुधवारी खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशानेने एक पाऊल उडी घेऊन अव्वल स्थानावर मजल मारली आहे. हा कांगारूच्या संघाचा फलंदाज कसोटी क्रमवारीतील पहिल्या स्थानावर पोहचला आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे मात्र नुकसान झाले आहे. जो रूटची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर विराट कोहलीदेखील एक पाऊल मागे आला आहे आणि सध्या सातव्या स्थानावर स्थित आहे. लक्षणीय बाब म्हणजे क्रमवारीतील पहिल्या १० फलंदाजांमध्ये या तिन्ही खेळाडूंमध्येच फेरबदल झाले आहेत. बाकी सर्व काही आधीच्या क्रमवारीनुसारआहे. रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

मार्नस लाबुशानेने काही दिवसांपूर्वीच ॲशेस मालिकेत शानदार शतक झळकावले होते. ज्याचा त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला. लाबुशानेने ॲडलेड पिंक-बॉल कसोटी सामन्यात १०३ आणि ५१ धावांची खेळी केली होती. लाबुशाने फलंदाजीच्या क्रमवारीत ९०० हून अधिक गुण मिळवणारा नववा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. यासोबतच त्याचा सर डॉन ब्रॅडमन, रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या यादीत समावेश झाला आहे.

गोलंदाजीच्या यादीत मिचेल स्टार्कची मोठी उडी

गोलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चमकदार कामगिरीच्या जोरावर मोठी उडी घेतली आहे. त्याने ४ पाऊलांच्या मोठ्या फरकाने पहिल्या १० गोलंदाजात जागा मिळवली आहे. स्टार्क सध्या नवव्या स्थानावर पोहचला आहे. तर जोश हेजलवुडची एका स्थानावरून घसरण झाली आणि तो सध्या पाचव्या स्थानावर आहे. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या १० गोलंदाजांमध्ये एकच भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे. भारताकडून फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर कायम आहे.

First Published on: December 22, 2021 3:54 PM
Exit mobile version