Women ODI Ranking : मितालीने एका आठवड्यातच अव्वल स्थान गमावले

Women ODI Ranking : मितालीने एका आठवड्यातच अव्वल स्थान गमावले

मिताली राजने एका आठवड्यातच अव्वल स्थान गमावले

भारताची कर्णधार मिताली राजने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. फेब्रुवारी २०१८ नंतर अव्वल स्थान पटकावण्याची ही मितालीची पहिलीच वेळ होती. परंतु, एका आठवड्यातच तिला अव्वल स्थान गमावावे लागले आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलरने मितालीला मागे टाकत पुन्हा एकदा महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. टेलरने फलंदाजांसह अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

टेलरला चार स्थानांची बढती

विंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने गोलंदाजीत २९ धावांमध्ये तीन विकेट घेतानाच फलंदाजीत नाबाद १०५ धावांची खेळी केली. त्यामुळे फलंदाजांच्या क्रमवारीत टेलरला चार स्थानांची बढती मिळाली असून ती अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तिचे सध्या ७६६ गुण असून दुसऱ्या स्थानावरील मितालीच्या खात्यात ७६२ गुण आहेत.

मानधना नवव्या स्थानावर

एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांमध्ये मिताली ७६२ गुणांसह दुसऱ्या, तर भारताची सलामीवीर स्मृती मानधना ७०१ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तसेच अष्टपैलूंमध्ये भारताची दीप्ती शर्मा ३३१ गुणांसह पाचव्या स्थानी कायम आहे. या यादीत स्टेफनी टेलर ४३५ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचली असून ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ४१८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

First Published on: July 13, 2021 8:54 PM
Exit mobile version