क्रीडाविश्वात आदिवासी खेळाडूंचा ठसा

क्रीडाविश्वात आदिवासी खेळाडूंचा ठसा

साईप्रसाद पाटील । नाशिक

अ‍ॅथलेटिक्सची खाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिक जिल्ह्यात एकूण खेळाडूंचा विचार केला, तर आदिवासी दुर्गम भागातील खेळाडूंचे यश नेहमीच उजवे राहिल्याचे दिसून येते. आजच्या या जागतिक आदिवासी दिनी नाशिकच्या आदिवासी खेळाडूंचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही, यासाठी विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवणार्‍या खेळाडूंविषयी थोडक्यात…

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लपलंलं खोबाळा दिगर हे गाव शहरी सुविधांपासून किती तरी दूर आहे. परंतु, या आदिवासी पाड्याने नाशिकलाच नाही तर देशाला खो-खोमधला हिरा दिला. चंदू सखाराम चावरे असे या मुलाचे नाव आहे, ज्याने खो-खोमधील चपळता आणि प्रतिस्पर्ध्याला घेरणारी नजर या वैशिष्ठ्यांच्या जोरावर आपली कारकिर्द घडवली. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय उपकनिष्ठ स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी चंदूने केली. याशिवाय नाशकातूनच एका छोट्याशा पाड्यावरील धावपटूने आंतरराष्ट्रीय पदकविजेते बनण्याचा प्रवास केला, त्या सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांच्याही कामगिरीमुळे आजवर अनेक जण अ‍ॅथलेटिक्समध्ये येण्याची प्रेरणा उरी बाळगताना दिसताहेत. त्यांच्याच पावलावर पावले ठेवत ताई बाम्हणेनेही आजवर अनेक राज्य स्पर्धा, मॅरेथॉनमध्ये आपली छाप सोडली आहे. तर अशाच एका आदिवासी पाड्यावरून आलेल्या ज्योती पवार आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, नाशिकचे नाव उंचावत कबड्डी या क्रीडाप्रकारात उत्तुंग भरारी घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव उंचावण्यासाठी तिचे योगदान महत्त्वाचे ठरते. या खेळाडूंसह एक हात नसलेल्या आणि व्हीडीके फाऊंडेशनच्या काळे सरांनी दत्तक घेतलेला दिलीप गावित हा धावपटूही नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अन् महाराष्ट्राबाहेरही ओळखला जाऊ लागला आहे. खेलो इंडियासाठीही त्याला प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यापूर्वी त्याने अनेक स्पर्धांमध्ये एकाकी विजय मिळवला. त्याच्याचप्रमाणे किसन तडवी यानेही अनेक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

याच खेळाडूंप्रमाणे पेठच्या एका पाड्यावरील भागीनाथ गायकवाड या धावपटूनेही गुजरातला ५२ हजारांचे पारितोषिक जिंकत आपली पहिलीच मॅरेथॉन गाजवली. त्याच्या धावण्याच्या अंदाजाला महाराष्ट्राबाहेरही प्रचंड दाद मिळाली. त्याच्यासह हेमलता गायकवाड या खेळाडूने एव्हरेस्टवीर म्हणून स्वत:ची ओळख बनवली, तर खो खोतही विशेष कामगिरी केली.

First Published on: August 9, 2022 3:33 PM
Exit mobile version