IND vs AUS : भारताची सुरुवात पराभवाने

IND vs AUS : भारताची सुरुवात पराभवाने

ऑस्ट्रेलियन खेळाडू जल्लोष करताना (सौ-Cricinfo)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार ४ धावांनी जिंकला. त्यामुळे भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली आहे. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे १७ धावांचा करण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्पिनर अॅडम झॅम्पाने चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटकांत २२ धावा देत २ विकेट घेतल्या. त्यामुळे १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला १६९ धावा करता आल्या.

लिन, मॅक्सवेलची फटकेबाजी 

या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून कर्णधार अॅरॉन फिंच (२४ चेंडूंत २७ धावा), क्रिस लिन (२० चेंडूंत ३७ धावा), ग्लेन मॅक्सवेल (२४ चेंडूंत ४६ धावा) आणि मार्कस स्टोइनिस (१९ चेंडूंत ३३ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या डावाच्या १६ व्या षटकात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना १७ षटकांचा करण्यात आला. या १७ षटकांत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ अशी धावसंख्या केली. पण डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला १७४ धावांचे आव्हान मिळाले.

शिखरची दमदार खेळी वाया 

१७४ धावांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी केली. शिखरने अप्रतिम फलंदाजी करत ४२ चेंडूंत ७६ धावा केल्या. पण भारताला ६९ धावांची गरज असताना तो बाद झाला. यानंतर रिषभ पंत (१६ चेंडूंत २०) आणि दिनेश कार्तिक (१३ चेंडूंत ३०) यांनी भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्याने भारताने हा सामना ४ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून स्पिनर अॅडम झॅम्पाने २२ धावा देत २ विकेट घेतल्या.
First Published on: November 21, 2018 6:00 PM
Exit mobile version