IND vs ENG : शुभमन गिलची दुखापत गंभीर; किमान दोन महिने रहावे लागणार मैदानाबाहेर

IND vs ENG : शुभमन गिलची दुखापत गंभीर; किमान दोन महिने रहावे लागणार मैदानाबाहेर

शुभमन गिल

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यापासून पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. परंतु, या मालिकेला सुरुवात एका महिन्याहूनही अधिकचा कालावधी असतानाच भारताला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल या मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकणार नाही अशी चर्चा सुरु होती. परंतु, त्याला नक्की काय दुखापत आहे, हे स्पष्ट झाले नव्हते. परंतु, आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. गिलच्या पायाला गंभीर दुखापत (Shin Stress Fracture) झाली असून त्याला किमान पुढील दोन महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या किमान पहिल्या तीन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही, हे निश्चित असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अखेरच्या दोन कसोटींनाही मुकणार?

शुभमनच्या पायाला दुखापत झाली असून त्याला किमान दोन महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत तो खेळू शकणार नाही, हे निश्चित आहे. अखेरचे दोन कसोटी सामने सप्टेंबरमध्ये होणार असून तोपर्यंत तो फिट होईल याचीही खात्री नाही, असे सूत्रांनी सांगितले.

इंग्लंडमध्येच राहून उपचार घेणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यादरम्यान गिलची दुखापत वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिलला झालेली दुखापत ही गंभीर असली तरी त्यामुळे त्याच्या कारकिर्दीला धोका नाही. मात्र, त्याला विश्रांती आणि दुखापतीवर उपचार घेण्यासाठी बराच काळ मैदानाबाहेर रहावे लागू शकेल, असे भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाला वाटते. गिल आता भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल, तसेच स्ट्रेंथ आणि कंडीशनींग प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या देखरेखीत इंग्लंडमध्येच राहून उपचार घेणार आहे.

First Published on: July 1, 2021 8:41 PM
Exit mobile version