IND vs ENG : पंतला कोरोनाची बाधा; जय शाहांकडून सर्व खेळाडूंना काळजी घेण्याचे आवाहन

IND vs ENG : पंतला कोरोनाची बाधा; जय शाहांकडून सर्व खेळाडूंना काळजी घेण्याचे आवाहन

रिषभ पंतला कोरोनाची बाधा

भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारताचे सर्व खेळाडू पुन्हा एकत्र जमले असून डरहमसाठी रवाना झाले आहेत. परंतु, भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत या खेळाडूंसोबत प्रवास करू शकला नाही. पंतला कोरोनाची बाधा झाली असून त्याला काही दिवस इतर खेळाडूंपासून वेगळे राहावे लागणार आहे. पंत मागील आठ दिवस क्वारंटाईन असून त्याला आता कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, पंतला कोरोनाची बाधा झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चिंतेत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व खेळाडूंना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जय शहा यांचे खेळाडूंना पत्र

एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. हा खेळाडू मागील आठ दिवस क्वारंटाईन आहे. हा खेळाडू संघापासून दूर आहे. इतर कोणत्याही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. तसेच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंना पत्र लिहून त्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, असेही शुक्ला म्हणाले.

पंतने पाहिला युरो स्पर्धेचा सामना

मागील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तसेच त्यांना इंग्लंडमध्ये फिरण्याचीही परवानगी देण्यात आली होती. परंतु, जय शाह यांनी खेळाडूंना पत्र लिहून विम्बल्डन आणि युरो स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी जाणे टाळा असे सांगितले होते. परंतु, पंतने युरो स्पर्धेचा सामना वेम्बली स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता.

First Published on: July 15, 2021 3:30 PM
Exit mobile version