IND vs ENG : रिषभ पंत कोरोनामुक्त? सराव सामन्याला मात्र मुकणार

IND vs ENG : रिषभ पंत कोरोनामुक्त? सराव सामन्याला मात्र मुकणार

रिषभ पंत कोरोनामुक्त?

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली असून यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. पंतला ८ जुलैला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता त्याचा क्वारंटाईनचा कालावधीत संपला असून त्याचा कोरोनाचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. मात्र, असे असले तरी पंतला मंगळवारपासून सुरु होणाऱ्या सराव सामन्याला मुकावे लागणार आहे. भारत आणि कौंटी सिलेक्ट इलेव्हन या संघांमध्ये २० ते २२ जुलै या कालावधी सराव सामना होणार असून या सामन्यापूर्वी पंत भारताच्या डरहम येथील बायो-बबलमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु, तो सराव सामन्यात खेळू शकणार नाही.

राहुल यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल

पंत आणि वृद्धिमान साहा हे भारताचे दोन्ही यष्टीरक्षक मंगळवारपासून सुरु होणाऱ्या सराव सामन्याला मुकणार आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. राहुलला मागील काही काळ कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याचे या सराव सामन्यात दमदार कामगिरी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असले. या सराव सामन्याला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा देण्यात आला आहे. पंत या सामन्यात खेळू शकणार नसला तरी तो दुसऱ्या सराव सामन्याला उपलब्ध असेल.

मंगळवारी डरहम येथे दाखल होण्याची शक्यता

पंत आणि भारतीय संघाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच दयानंदच्या संपर्कात आलेल्या वृद्धिमान साहा, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते. परंतु, आता पंतचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून तो मंगळवारी लंडनहून डरहम येथे दाखल होण्याची शक्यता आहे.

First Published on: July 19, 2021 9:00 PM
Exit mobile version