IND-W vs ENG-W : ‘हा आमचा खिलाडूपणा…’; हरमनप्रीत कौरचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर

IND-W vs ENG-W : ‘हा आमचा खिलाडूपणा…’; हरमनप्रीत कौरचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर

भारतीय महिला क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. तसेच, इंग्लंड विरूद्ध 3-0 ने मालिका जिंकली. मात्र, या सामन्यात भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज शार्ली डीनला मांकडिंगद्वारे धावबाद केले. यावरून क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले असून, या चर्चांना हरमनप्रीत कौरने चोख उत्तर दिले आहे. (ind w vs eng w deepti sharma run out charlie dean non striker amy jones harmanpreet)

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यातील 44 वे षटक भारताची दिग्गज ऑलराऊंडर दिप्ती शर्मा टाकत होती. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी अजून 16 धावा करायच्या होत्या. शार्ली डीन ही शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी नॉन स्ट्रायकरच्या एंडला उभी असलेली डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर गेली आणि दीप्तीने बेल्स उडवत तिला बाद घोषित केले.

त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मांकडिंगसाठी अपील केले. यावेळी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. रिप्लेत डीनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डीनला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला. तर इंग्लिश खेळाडू यामुळे प्रंचड नाराज दिसले.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर इंग्लंडची कर्णधार एमी जोन्सला या धावबादबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तिने भारताच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “सामना अशाप्रकारे संपणे दु:खद आहे. याबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. मी या नियमाची चाहती नाही. भारतीय संघ याकडे कसे पाहतो हे मला माहीत नाही”, असे म्हटले.

त्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या धावबादसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने ”मला वाटले होते की तुम्ही पहिल्या ९ विकेट्सबद्दल विचाराल कारण ते घेणेही सोपे नव्हते. आम्ही काही चुक केली आहे असे मला वाटत नाही. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येते. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन”, असे म्हटले.


हेही वाचा – भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी अखेर निवृत्त; शेवटच्या सामन्यात घेतले 2 बळी

First Published on: September 25, 2022 3:08 PM
Exit mobile version