IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंचे मत

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंचे मत

भारतीय क्रिकेट संघ 

‘पहिल्या दोन कसोटी सामन्यांत इंग्लंडने सर्वोत्तम खेळाडूंची संघात निवड केलेली नाही. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत भारताचे पारडे जड आहे,’ असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत. या दोन सामन्यांसाठी इंग्लंडने जॉनी बेअरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय पीटरसनला फारसा आवडलेला नाही. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डॉमिनिक कॉर्कही पीटरसनशी सहमत होता. ‘भारतीय संघ ही कसोटी मालिका जिंकेल. इंग्लंडचा संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. असे असले तरी इंग्लंड भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकेल असे मला वाटत नाही,’ असे कॉर्क म्हणाला.

सर्वोत्तम संघ निवडलेला नाही

‘भारताला घरच्या मैदानावर खेळण्याचा खूप अनुभव आहे. भारताला भारतात पराभूत करणे नेहमीच अवघड असते. विराट कोहलीचे आता संघात पुनरागमन झाले आहे. त्यातच पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने सर्वोत्तम संघ निवडलेला नाही. जॉनी बेअरस्टोला संघात घेतले पाहिजे होते. मात्र, इंग्लंडने त्याला विश्रांती देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत भारताचे पारडे जड आहे,’ असे पीटरसनने नमूद केले.

इंग्लंडपुढे बरेच प्रश्न

तसेच इंग्लंडच्या संघापुढे बरेच प्रश्न आहेत, असेही पीटरसनला वाटते. ‘श्रीलंकेविरुद्ध जो रूटने अप्रतिम कामगिरी केली. मात्र, इंग्लंडच्या सलामीवीरांना चांगला खेळ करता आला नाही. त्यांच्याकडे कामगिरीत सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का? रोरी बर्न्सला पुन्हा संधी मिळणार का? जिमी अँडरसन यशस्वी ठरू शकणार का? असे बरेच प्रश्न इंग्लंडसमोर आहेत,’ असे पीटरसन म्हणाला.


हेही वाचा – पंत की साहा; पहिल्या कसोटीत ‘या’ यष्टिरक्षकाला मिळणार संधी?  


 

First Published on: February 2, 2021 8:23 PM
Exit mobile version