पहिल्या दिवशी भारत आघाडीवर

पहिल्या दिवशी भारत आघाडीवर

येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या भेदक मार्‍यासमोर चाचपडणार्‍या बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशने घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत बांगलादेशला अवघ्या ५८.३ षटकांत गुंडाळले.

बांगलादेशच्या डावाची सुरुवातच अडखळत झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी सहा धावा काढून तंबूत परतले. विशेष म्हणजे, तब्बल सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही उभारता आली नाही. कर्णधार मोमीनूल हक आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची झुंज अपेशी ठरली. हक ३७ धावांवर तंबूत परतला तर, मुशफिकूरला मोहम्मद शमीने ४३ धावांवर टिपले. अन्य फलंदाजही ठराविक अंतराने बाद होत गेले.

मधल्या फळीतील मोहम्मद मिथुन याने १३, महमुदुल्लाहने १० तर लिटन दास याने २१ धावा केल्या. बांगलादेशचा एकही फलंदाज ५० धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. भारताकडून मोहम्मद शमी यानं तीन गडी बाद केले. इशांत शर्मा, उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर, एक जण धावबाद झाला.

तर भारतीय संघाची सुरूवात देखील खराब झाली.भारतीय संघाची धावसंख्या केवळ 14 असताना रोहित शर्मा अवघ्या 6 धावा काढून तंबूत परतला.पहिल्या दिवसअखेर भारताने 26 षटकांत 1 गडी गमावत 86 धावांपर्यंत मजल मारली होती.भारताकडून मयांक अगरवाल 37 आणि पुजारा 43 धावांवर खेळत आहेत.

अश्विनचा विक्रम

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळताना आज एक मैलाचा टप्पा ओलांडला. बांगलादेशचा कर्णधार मोमेनुल हक याला बाद करत अश्विनने भारतीय मैदानावर २५० कसोटी बळी टिपण्याचा पराक्रम केला. माजी फिरकीपटू अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा अश्विन हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच, ४२ व्या कसोटीत २५० बळी घेण्याच्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाचीही त्याने बरोबरी केली आहे.

First Published on: November 15, 2019 5:47 AM
Exit mobile version